ट्रेस होऊनही 'गोल्डन गँग'च्या मुसक्या बांधण्यात रेल्वे पोलिसांना अपयश
By नरेश डोंगरे | Updated: November 21, 2025 21:56 IST2025-11-21T21:55:34+5:302025-11-21T21:56:05+5:30
सव्वा दोन कोटींच्या सोन्याचा तपास थंडबस्त्यात : एलसीबीचे ढुंढो ढुंढो रे साजना : लंपास केलेला माल 'पचण्याची' भिती

ट्रेस होऊनही 'गोल्डन गँग'च्या मुसक्या बांधण्यात रेल्वे पोलिसांना अपयश
- नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हावडा-मुंबई मेलमधून सव्वादोन कोटींचे सोने उडविणारी गोल्डन गँग पोलिसांना ट्रेस झाली. मात्र, महिनाभराचा कालावधी होऊनही या टोळीच्या मुसक्या बांधण्यात रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले नसल्याने पोलिसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसमधून सराफा व्यापारी किशोर ओमप्रकाश वर्मा (वय ४४, रा. गणपतीनगर, रा. जळगाव) रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ ला प्रवास करीत होते. त्यांच्याजवळ २.११ कोटी रुपये किमतीचे सोने होते. बडनेरा जवळ चोरट्यांनी हे सोने लंपास केले. या प्रकरणी रेल्वे पोलिसांना गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन हा तपास नागपूर रेल्वेच्या क्राइम ब्रँचला (एलसीबी) सोपविण्यात आला. या तपासाला सायबरचे बळ मिळाल्याने ही धाडसी चोरी करणारी टोळी ट्रेस झाली. पश्चिम महाराष्ट्रातील या कुख्यात टोळीने अशाच प्रकारे मराठवाडा, आंध्रातही अनेक धाडसी चोरी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. मात्र, एवढी भक्कम माहिती हाती लागूनही ट्रेस झालेल्या या टोळीतील एकाही सदस्याच्या मुसक्या आवळण्यात रेल्वेच्या गुन्हे शाखेला यश आलेले नाही. त्यामुळे त्या टोळीने चोरलेल्या सोन्याची विल्हेवाट लावली की काय अर्थात हे सोने पचते की काय, अशी शंका वजा भिती संबंधितांना सतावत आहे.
तपास पथकाचा थंडपणा
सव्वादोन कोटींच्या सोन्यावर हात मारल्यानंतर या टोळीच्या सदस्यांनी बाहेरच्या बाहेर दिवाळी साजरी केली. ईकडे थंडीचा कडका वाढल्यामुळे की काय, हा तपास एलसीबीने थंडबस्त्यात टाकल्यासारखे झाले आहे.
या संबंधाने एलसीबी तपास पथकाचे प्रमूख सहायक निरीक्षक विनायक डोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरू आहे, असे सांगितले.