रेल्वेच्या किचनलाही एलपीजीच्या सिलेंडर टंचाईची झळ; जेवणाची काय व्यवस्था ?
By नरेश डोंगरे | Updated: March 17, 2026 20:24 IST2026-03-17T20:24:10+5:302026-03-17T20:24:58+5:30
Nagpur : देशातील विविध भागात रोज लाखो लोकांच्या रात्रंदिवस जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था सांभाळणाऱ्या भारतीय रेल्वेच्या किचनलाही एलपीजीच्या सिलेंडर टंचाईची झळ पोहचण्याची भिती निर्माण झाली आहे.

Railway kitchens also face LPG cylinder shortage; What are the arrangements for food?
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील विविध भागात रोज लाखो लोकांच्या रात्रंदिवस जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था सांभाळणाऱ्या भारतीय रेल्वेच्या किचनलाही एलपीजीच्या सिलेंडर टंचाईची झळ पोहचण्याची भिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टूरिजम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मार्फत प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवण व्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्थेवर भर देण्याचे सांगण्यात आले आहे.
रेल्वेतून रोज लाखो प्रवासी जा-ये करतात. त्यांच्यासाठी दिवसरात्र जेवण तसेच नाश्ता तयार करण्याचे काम ठिकठिकाणच्या 'बेस किचन'मध्ये केले जाते. या बेस किचनमध्ये रेल्वेगाड्यांसाठी अन्न तयार केले जाते आणि ते पुढे पेंट्री कारमध्ये पाठवले जाते. पेंट्री कार प्रामुख्याने अन्न वाटप आणि पुन्हा गरम करण्यासाठी वापरल्या जातात. त्यामध्ये सहसा एलपीजी सिलेंडर साठवले जात नाहीत. मात्र, काही ठिकाणच्या बेस किचनलाच सिलेंडरच्या टंचाईची झळ बसल्याने लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांतील भोजन पुरवठा साखळी विस्कळीत होत असल्याची चर्चा आहे. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजनावर भर दिला आहे. प्रवाशांना अडचण येऊ नये यासाठी आयआरसीटीसीने आपल्या केटरिंग परवानाधारकांना पर्यायी योजना (कंटिजन्सी प्लॅन) तत्काळ राबवण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.
नागपूर विभागात 'नो प्रॉब्लेम'
नागपूर मध्ये मध्य रेल्वेचे (सीआर) आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे (एसईसीआर) असे दोन मुख्यालय असून, या विभागातून रोज २०० वर रेल्वेगाड्यांचे संचालन होते. त्यातून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. (एकट्या नागपूरमध्ये रोज सुमारे ५५ हजार प्रवाशांचे जाणे-येणे असते.) एलपीजीच्या टंचाईचा फटका काही ठिकाणी आयआरसीटीसीच्या बेस किचनला बसत असला तरी सीआर आणि एसईसीआर अशा दोन्ही विभागात काहीही अडचण नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सीआरचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांच्या माहितीनुसार, नागपूर विभागात नागपूर, बल्लारशाह, वर्धा आणि बैतूल या चार ठिकाणी बेस किचन आहेत. तर, एसईसीआरचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्या माहितीनुसार, नागपूर विभागात केवळ गोंदिया या एकाच ठिकाणी एसईसीआरचे बेस किचन आहे. मात्र, या दोन्ही विभागातील पाचही बेस किचनवर सिलेंडर टंचाईचा कसलाही परिणाम आजपर्यंत झालेला नाही.