राशन माफियांकडे छापे, वितरण अधिकाऱ्यांची संशयास्पद तटस्थता
By नरेश डोंगरे | Updated: November 20, 2025 23:07 IST2025-11-20T23:07:04+5:302025-11-20T23:07:39+5:30
शालेय पोषण आहाराचे पॅकेट अन् एकात्मिकचे कट्टे : अधिकारी म्हणतात, धान्य आमचे नव्हेच

राशन माफियांकडे छापे, वितरण अधिकाऱ्यांची संशयास्पद तटस्थता
- नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील सरकारी धान्य वितरण प्रणालीतील काळाबाजार सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. त्याची तक्रार मंत्रालयापर्यंत झाली असली तरी येथील अधिकारी मात्र राशन माफियांवरील कारवाईच्या संबंधाने हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आहेत. चार दिवसांत धान्याच्या 'अवैध' गोदामांवर दोन वेळा छापे पडल्याने हा विषय पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, 'लोकमत'ने १५ ते १९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत 'अन्न पुरवठा विभागात सुरू असलेल्या घोळाचा पर्दाफाश' करणारी मालिक प्रकाशित केली होती. यात भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगणमत करून राशन माफिया 'गरिबांच्या हक्काचे अन्न ओरबडून खात असल्याचा वृत्तांत मांडला होता. गरिबांसाठी असलेला तांदूळ कंची मारून बाजारात विकला जातो, महिन्याला १३०० पोती धान्य पद्धतशिर गायब केले जाते आणि अधिकारी मात्र मुग गिळून बसल्याचेही स्पष्ट केले होते. या वृत्त मालिकेची जिल्हाधिकाऱ्यांसह अन्न पुरवठा मंत्रालयानेही दखल घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतल्यानंतर येथील एफडीओ आणि डीएसओने या संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन कारवाई करण्याचे जाहिर केले होते. मात्र, तसे काहीही झाले नाही. याऊलट राशन माफिया पुन्हा सक्रिय झाले. यापैकी विक्की कंगवाने, सोनू ठाण, रितेश, नासरे, केसरवाने आदींनी आपल्या गोदामात मोठ्या प्रमाणात धान्याचा अवैध साठा जमा केल्याची माहिती चर्चेला आली होती. 'लोकमत'च्या वृत्तानंतर शहरातील एका मोठ्या नेत्याकडून त्याची तक्रार झाल्यानंतर सोमवार ते बुधवार दरम्यान पोलिसांनी जरीपटका, टेकानाका आणि यशोधरानगर भागात गोदामांवर छापे घातले. या छाप्यात शालेय पोषण आहाराचे पॅकेट आणि एकात्मकचे कट्टे आढळले. त्यामुळे अन्न वितरण पुरवठा अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. तेथे डीएसओ पडोळे आणि प्रभारी एफडीओ काळे पोहचले. मात्र, त्यांनी हे धान्य आमच्या विभागाचे नाही', असे म्हटले. हे वृत्त जिल्हा पुरवठा यंत्रणेत चर्चेला आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
माफियांचे 'आका'ना 'फोनो फ्रेण्ड'
सूत्रांच्या माहितीनुसार, कारवाईत खिचडी आणि राशनचा २० टनांपेक्षा जास्त तांदुळ सापडला आहे. या कारवाईनंतर राशन माफियांकडून आपल्या 'आका'कडे 'फोनो फ्रेण्ड' करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, या संबंधाने एफडीओ विनोद काळे यांच्याकडे संपर्क केला असता, मंगळवारी आपण कारवाईच्या ठिकाणी गेलो होतो. गोंदियातून माल घेत असल्याने छाप्यात आढळलेला माल आपला नसल्याचे आपण पोलिसांना सांगितले. मंगळवार, बुधवारच्या छाप्याची कारवाई करणाऱ्या पोलिसांकडून आपल्याला पत्र आल्यानंतर आपण कारवाई करू, अशी माहितीवजा प्रतिक्रिया काळे यांनी दिली.