नशायुक्त कफ सिरपची विक्री करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड, औषध दुकानदाराला अटक
By योगेश पांडे | Updated: November 20, 2025 18:20 IST2025-11-20T18:20:12+5:302025-11-20T18:20:56+5:30
विना प्रिस्क्रिप्शन अवैध औषधांची विक्री : दुकान, घरात औषधांचा साठा

Racket selling intoxicating cough syrup busted, drugstore owner arrested
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तरुणांकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. यात एक औषध दुकानदार आरोपी असून त्याच्या दुकान व घरातून अवैध औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. विना प्रिस्क्रिप्शन तो औषधांची विक्री करत होता. लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
तुषार पवन अग्रवाल (२९, बालाजी मंदिर मार्ग, इतवारी) व भरतकुमार दीपककुमार अमरनानी (३४, भिलगाव, कळमना) अशी आरोपींची नावे आहेत. तुषारचे इतवारीतील मासुरकर चौकात भगवती मेडिकल शॉप आहे. तरुणांकडून नशेसाठी वापर करण्यात येत असलेल्या कोडेन फॉस्फेट युक्त औषधांची त्याच्याकडे विक्री होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. हा प्रकार अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक प्रशांत रामटेके यांना कळविण्यात आला. बुधवारी मध्यरात्री रामटेके यांच्यासह लकडगंज पोलीस ठाण्याचे पथक औषध दुकानाजवळ पोहोचले. डमी ग्राहक पाठवून ऑनरेक्स कफ सायरप हे औषध मागविण्यात आले. ग्राहकाने इशारा केल्यावर पोलिसांनी तेथे धाड टाकली. तेथे ऑनरेक्स कफ सायरपचे ५९ व कुफ्डेन कफ सायरपच्या १२ बाटल्या आढळल्या. दोन्ही औषधांत नशेसाठी वापरण्यात येणारे कोडेन फॉस्फेट होते. त्यानंतर पोलिसांनी तुषारच्या घराची झडती घेतली. दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी २.४८ लाखांचा माल जप्त केला. हा माल कुठल्याही बिलाशिवाय भरतकुमार अमरनानीने पुरविल्याची माहिती तुषारने दिली. त्याच्या घरातून इतरही काही अवैध औषधे जप्त करण्यात आली आहेत. रामटेके यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, संदीप शिंदे, सागर शिंदे, नरेंद्र वाघमारे, हितेश राठोड, अरविंद तायडे, सूरज मडावी, संजीवनी मते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
औषधांच्या बॅचेसमध्ये खोडतोड
दरम्यान, तुषार याच्या दुकानात विविध कंपन्यांच्या आणखी औषधी व गोळ्यादेखील आढळल्या. त्यातील बॅचेस क्रमांकामध्ये खोडतोड केली होती. तसेच एक्स्पायरी डेटवरदेखील खोडतोड दिसून आली.
शहरातील अनेक दुकानांत पुरवठा
अमरनानीकडून या नशायुक्त औषधांचा पुरवठा करण्यात आला होता. त्याच्याकडून शहरात इतरही अनेक दुकानांत अशाच पद्धतीने पुरवठा करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत.