नियतीसोबत जवळच्यानी दिला धक्का

By Admin | Updated: September 4, 2016 02:47 IST2016-09-04T02:47:06+5:302016-09-04T02:47:06+5:30

गर्भातच बाळाचा मृत्यू झाला. या धक्क्यातून ती सावरत नाही तोच नातेवाईकांनी असंवेदनशीलतेचा परिचय दिला.

Push closer with the result | नियतीसोबत जवळच्यानी दिला धक्का

नियतीसोबत जवळच्यानी दिला धक्का

मेडिकलमधील घटना : गर्भातच बाळाचा मृत्यू, नातेवाईकांनी काढला पळ
नागपूर : गर्भातच बाळाचा मृत्यू झाला. या धक्क्यातून ती सावरत नाही तोच नातेवाईकांनी असंवेदनशीलतेचा परिचय दिला. तिला रुग्णालयातच सोडून पळ काढला. याला आज १५ दिवस झाले. तिला घ्यायला कुणीच आले नाही. या घटनेने त्या महिलेची मानसिक स्थिती ढासळली. ती जेवतही नाही आणि बोलतही नाही. हृदय हेलावणारी ही घटना मेडिकलच्या वॉर्ड क्र. ३३ मधील आहे.
उर्मिला रामटेके (नाव बदललेले आहे) रा. गोंदिया असे त्या महिलेचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १६ आॅगस्ट रोजी ३५ वर्षीय उर्मिला आपल्या पती व दोन-तीन नातेवाईकांसोबत गोंदियावरून नागपूर मेडिकलमध्ये आली. डॉक्टरांनी तिला भरती करून घेतले. १८ आॅगस्ट रोजी तिची तपासणी झाल्यावर गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून मृत बाळ बाहेर काढले. याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. उर्मिलाला ही बातमी कळताच तिने हंबरडा फोडला.
दोन दिवस नातेवाईक तिच्यासोबत होते. मात्र, तिसऱ्या दिवशी अचानक पती व नातेवाईक कुणालाही न सांगता उर्मिलाला रुग्णालयातच सोडून गायब झाले. याला आज १५ दिवस होत असताना एकही नातेवाईक तिला भेटायला आला नसल्याचे समजते.(प्रतिनिधी)

तिचे बोलणेही बंद झाले
बाळ दगावल्याचा धक्का उर्मिलाच्या मनावर कोरला गेला. ती सदैव बाळाच्या विवंचनेतच राहते. जेवत नाही आणि बोलतसुद्धा नाही. यातच पती व नातेवाईकही अचानक सोडून गेल्यामुळे तिची मानसिक स्थिती ढासळली. मेडिकलचे अधिकारी व परिचारिका तिला पत्ता विचारतात, मात्र ती बोलतच नसल्याने रुग्णालय प्रशासनही अडचणीत आले आहे. या घटनेची तक्रार अजनी पोलिसात करण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांनी उर्मिला यांना मानसोपचार तज्ज्ञाकडेही दाखविल्याची माहिती आहे.

Web Title: Push closer with the result