पंजाबने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत केली, मग महाराष्ट्रात का नाही ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:10 IST2025-10-08T16:09:05+5:302025-10-08T16:10:51+5:30
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप : मदत पॅकेज फसवे

Punjab provided assistance of Rs 50,000 per hectare, so why not in Maharashtra?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची अपेक्षा होती. दुर्दैवाने सरकारने घेतलेला निर्णय तोंडाला पाने पुसणारा आहे. पंजाबने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत केली, मग महाराष्ट्र का देत नाही, असा सवाल काँग्रेसचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला. नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्रडेट्टीवार म्हणाले, पीक उद्ध्वस्त झाले, धान, फळबाग, द्राक्ष, मोसंबी उद्ध्वस्त झाले. जमीन खरडून गेली.
सरकारने तोकडी मदत आकडा फुगवून सांगितली आहे, हे ३१ हजार कोटी आले कुठून, फक्त आकड्यांचा खेळ आहे. पीक विम्याची पॉलिसी आहे, पाच नवीन निकष घातले. त्यात अतिवृष्टी असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा नाही, फळबाग टोमॅटोचा उल्लेख नाही. या सगळ्यात शेतकऱ्याला उद्ध्वस्त होण्यापासून पुरात लोटण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीची गरज होती. पण, घोषणा झाली नाही. कर्जमाफी देऊ म्हणतात. पण, कधी देणार ते सांगत नाहीत. या अपुऱ्या मदतीच्या विरोधात काँग्रेस जिल्हास्तरावर मोर्चे काढेल, असा इशारा त्यांनी दिला.
ओबीसी हक्कांसाठी न्यायालयात जाऊ
२ सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सरकार म्हणते, शपथपत्र तयार आहे. पण, निवडणुका काढण्याचे सरकारचे प्लॅनिंग आहे, असा आरोप करीत ओबीसींच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. आता आम्हाला टार्गेट करून बोलले जात आहे. कोणाच्या सांगण्यावरून हे करत आहे, हे 'अनपढ़ गवार'चे लक्षण आहे. बोलविता धनी कोणी तरी दुसराच आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.