पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
By नरेश डोंगरे | Updated: November 7, 2025 00:36 IST2025-11-07T00:35:03+5:302025-11-07T00:36:02+5:30
रेकीसाठी आला अन् दहा लाखांच्या ऐवजावर हात मारला : जीआरपीकडून प्रशंसनीय तपास

पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
-नरेश डोंगरे, नागपूर
टोळी प्रमुखाने रेकी करण्यासाठी पाठविलेल्या हरयाणातील कुख्यात साशी गँगच्या सदस्याने पहिल्याच फेरीत रेल्वे स्थानकावर तगडा हात मारला. मात्र, तक्रार मिळाल्यानंतर सुतावरून स्वर्ग गाठावा, तसा उत्कृष्ठ तपास करीत रेल्वे पोलिसांनी हरियाणात जाऊन आरोपीच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून चोरलेले १० लाखांचे सोन्याचे दागिनेही जप्त केले.
रामू पृथ्वीराज (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. महाराष्ट्रातील चड्डी बनियान, ईराणी टोळीसारखीच हरियाणात 'साशी गँग' कुख्यात आहे. या टोळीतील सदस्य विविध प्रांतात ट्रेन किंवा रेल्वे स्थानकांवर धाडसी चोऱ्या करतात.
१० वर्षांपूर्वी साशी गँगचा महाराष्ट्रात मोठा उपद्रव होता. मात्र, तत्कालीत रेल्वे पोलिसांनी या गँगच्या मुसक्या आवळून त्यांना बाजीरावचा जोरदार प्रसाद दिल्याने या गँगने ईकडे फिरकणे बंद केले. या गँगच्या म्होरक्याने गोंदिया-मुंबई, गोंदिया-पुणे रेल्वे ट्रॅकवर चोरीसाठी पूरक स्थिती आहे की नाही, त्याची माहिती काढण्यासाठी आरोपी रामूला नागपूरकडे पाठविले. धनतेरसच्या दिवशी रामू अजनी रेल्वे स्थानकावर रेकी करीत होता.
पुण्यात आयटी इंजिनिअर असलेले प्रशांत वंजारी (वय ४२) आपल्या पत्नी-मुलासह दिवाळी साजरी करण्यासाठी नागपुरात आले होते. अजनी स्थानकावर त्यांची थोडीशी गफलत झाली आणि आरोपीने संधी साधून त्यांची बॅग कापली. त्यातून ९.५ तोळे सोन्याचे दागिने लंपास करून आरोपी पसार झाला.
हादरलेल्या या दाम्पत्याने रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) तक्रार नोंदवली. या धाडसी चोरीची माहिती कळताच पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांना तपासाची जबाबदारी सोपविली.
प्रचंड गर्दी अन् अचूक वेध
गावंडे यांनी लगेच अजनी स्थानकावरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. दिवाळीच्या निमित्ताने स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीत वंजारी यांच्या बॅगशी छेडछाड करताना एक संशयीत पोलिसांनी हेरला.
धडधाकट, गोरागोमटा आरोपी साशी गँगच्या सदस्यासारखा दिसत असल्याने त्याचे फुटेज हरियाणा पोलिसांना पाठवून शहानिशा करण्यात आली. तिकडून आरोपी 'साशी गँगचाच सदस्य' असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे रेल्वे पोलिसांचे एक पथक तिकडे पाठविण्यात आले आणि रोहतकच्या वाल्मिकी वस्तीतून रामूला जेरबंद करण्यात आले.
टोळीने केली दिवाळी
आरोपीने सुमारे १० लाखांचे दागिने चोरून रोहतकला (हरियाणा) नेल्यानंतर सराफाकडून ते गाळून त्याचा गोळा तयार केला. त्यानंतर टोळीसह दिवाळी साजरी केली. रामूकडून पोलिसांनी सोन्याची लगडीही जप्त केली.
रेल्वेचे पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गौरव गावंडे यांच्या नेतृत्वात हवालदार पुष्पराज मिश्रा, श्रीकांत धोटे आणि अंमलदार अमित त्रिवेदी यांनी ही कामगिरी बजावली. आता आणखी कुठे हात मारला ते तपासले जात आहे.