सरकारच्या दणक्यानंतर पंपचालक स्विकारताहेत ऑनलाइन पेमेंट, विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असो.ची माघार

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 10, 2025 22:35 IST2025-05-10T22:34:46+5:302025-05-10T22:35:14+5:30

Nagpur:

Pump operators are accepting online payments after government's shock, Vidarbha Petroleum Dealers Association backs out | सरकारच्या दणक्यानंतर पंपचालक स्विकारताहेत ऑनलाइन पेमेंट, विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असो.ची माघार

सरकारच्या दणक्यानंतर पंपचालक स्विकारताहेत ऑनलाइन पेमेंट, विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असो.ची माघार

नागपूर : सायबर गुन्ह्येगारांमुळे पेट्रोल पंपचालकांचे बँकांमधील खाते सील होत असल्याचा बहाणा करून १० मेपासून ग्राहकांकडून ऑनलाईन पेमेंट न स्विकारण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने आठवड्यापूर्वी घेतला होता. परंतु सरकारच्या दणक्यानंतर असोसिएशनने निर्णय मागे घेतला. त्यामुळे सर्वच पंपावर ग्राहकांना ऑनलाइन पेमेंटने पेट्रोल व डिझेल खरेदी करता येईल. 

विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले, फोन पे, गुगल पे, पेटीएम, डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांमुळे अनेक पेट्रोल पंपचालकांना बँक खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी आणि फसवणुकीला सामोरे जावे लागत होते. नागपूर जिल्ह्यात दोन वा तीन प्रकरणांमध्ये पंपचालकांची बँक खाती गोठवली होती आणि नंतर ती खुली केली. त्यामुळे पंपचालकांची गैरसोय झाली होती.

कोविडनंतर डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागपूर शहरात दररोज हजारो ग्राहक पेट्रोल पंपांवर विविध अ‍ॅप्सद्वारे पेमेंट करतात. देशातील आर्थिक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने सर्व व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पंपचालकांना कठोर सूचना केल्या आहेत. त्यामुळेच डीलर्स असोसिएशनने ऑनलाइन पेमेंट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागपूर जिल्ह्यातील ग्राहक आता पूर्वीप्रमाणेच आपल्या पसंतीच्या अ‍ॅप्सद्वारे सुरक्षितपणे पेट्रोल पंपांवर पेमेंट करू शकतील.

... तर पंपचालकांवर झाले असते गुन्हे दाखल
जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत पंपचालकांनी पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी केंद्र सरकारने लागू केलेले ऑनलाइन पेमेंट (चलन) नाकारले असते, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असते. प्रसंगी पेमेंट नाकारलेल्या पंपचालकांचे परवानेही रद्द झाले असते. पंपचालकांचा निर्णय सरकारला वेठीस धरण्याचा होता. कारवाईच्या भितीपोटी आणि नाईलाजाने पंपचालकांनी ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

Web Title: Pump operators are accepting online payments after government's shock, Vidarbha Petroleum Dealers Association backs out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.