शाळा दत्तक योजनेविरोधात वंचितचे आंदोलन, सरकारवर केले आरोप
By निशांत वानखेडे | Updated: October 31, 2023 18:33 IST2023-10-31T18:30:12+5:302023-10-31T18:33:04+5:30
सरकारी शाळा खासगीकरणाचा निर्णय सरकारने जर मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

शाळा दत्तक योजनेविरोधात वंचितचे आंदोलन, सरकारवर केले आरोप
नागपूर : राज्य सरकारच्या शाळा दत्तक योजनेविरोधात मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण विभागातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. सरकारी शाळांच्या महागड्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी सरकारने हे धोरण आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
वंचितचे दक्षिणचे कार्याध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वात शताब्दी चौक येथे आंदोलन करण्यात आले. खेड्यापाड्यातील गरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून सरकारी शाळांचा आधार असताे. मात्र सरकारी शाळांची सुविधा खिळखिळी करण्याचा सरकारतर्फे सातत्याने प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षणाच्या अवाढव्य खर्चामुळे भविष्यात मुलींच्या शिक्षणालाही खिळ बसेल, अशी भीती व्यक्त केली.
सरकारी शाळा खासगीकरणाचा निर्णय सरकारने जर मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात शहर महासचिव राहुल दहीकर, धर्मेश फुसाटे, दक्षिण प्रभारी दिनकर वाठोरे, शहर सहसचिव विशाल वानखेडे, महिला महासचिव- अलका गजभिये, रजनी पिल्लेवान ,सुनिता पाटील, सूर्यमाला लोखंडे, चंद्रप्रभा लोखंडे, मनोरमा लांजेवार, जयमाला श्रीरामे, माया पाटील, प्रशांत मून, देवानंद वानखेडे, गंगाधर कांबळे आदींचा सहभाग होता.