धक्कादायक! प्रजापतीकडून स्वत:च्याच मुलाची २५ हजारांत विक्री; खोटे नाव वापरून दत्तक प्रक्रिया

By योगेश पांडे | Published: November 18, 2022 12:44 PM2022-11-18T12:44:09+5:302022-11-18T12:50:37+5:30

आरोपी पती-पत्नीसह छत्तीसगडमधील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

Prajapati's sale of his own son for 25 thousand; Adoption process using a false name | धक्कादायक! प्रजापतीकडून स्वत:च्याच मुलाची २५ हजारांत विक्री; खोटे नाव वापरून दत्तक प्रक्रिया

धक्कादायक! प्रजापतीकडून स्वत:च्याच मुलाची २५ हजारांत विक्री; खोटे नाव वापरून दत्तक प्रक्रिया

Next

नागपूर : डिप्टीसिग्नल येथील आठ महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण करणारे प्रजापती दाम्पत्य मुलांच्या खरेदी-विक्रीत अनेक दिवसांपासून सहभागी होते. आश्चर्याची बाब म्हणजे चौकशीदरम्यान प्रजापतीने स्वत:च्याच मुलाला छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील दाम्पत्याला अवघ्या २५ हजारांसाठी विकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चारजणांविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून आरोपी योगेंद्र प्रजापतीची कसून चौकशी सुरू आहे. त्याने चौकशीदरम्यान छत्तीसगडमध्ये स्वत:च्याच मुलाची विक्री केल्याची बाब कबूल केली. जून २०२२ मध्येच यासंदर्भातील सौदा झाला होता. त्यावेळी दोघेही पती-पत्नी राजनांदगाव येथे आश्रयाला होते. त्याची पत्नी पाचव्यांदा गरोदर असताना तिला भंडारा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यावेळी तेथे एक महिलादेखील भरती होती व तिचा नातेवाईक असलेल्या सुरेंद्र मेश्रामसोबत प्रजापतीची ओळखी झाली.

बालतस्करी रॅकेट; अपहरणातील आरोपींकडून अनेक मुलांची खरेदी- विक्री

मेश्रामशी बोलत असताना स्वत:ला चार मुले असल्याची माहिती प्रजापतीने दिली. मेश्रामने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व एकही मूल नसल्याने एक मूल देण्याची विनंती केली. याबदल्यात २५ हजार रुपये देण्याची तयारी दाखविली. प्रजापतीने सनी या एक वर्षाच्या मुलाची मेश्राम दाम्पत्याला विक्री केली. या प्रकरणात पोलिसांनी प्रजापती दाम्पत्याविरोधात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय मुलाची खरेदी करणाऱ्या राजनांदगाव येथील मेश्राम दाम्पत्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

८ महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या प्रजापती दाम्पत्याचे भंडाऱ्यातही रॅकेट?

राजनांदगावमध्ये जाऊन केली प्रक्रिया

रुग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर प्रजापती दाम्पत्याने राजनांदगाव येथील छुरिया तालुक्यातील बागनदी या गावात जाऊन मेश्राम दाम्पत्याची भेट घेतली. तेथे ते आठवडाभर राहिले. यासंदर्भातील दत्तकपत्र प्रजापतीने तयार केले व ते नोटरी केले, अशी माहिती त्याने दिली. पोलिसांनी दत्तकपत्राची पाहणी केली असता त्यात प्रजापतीने स्वत:चे नाव योगेंद्र ऊर्फ प्रभूलाल ठलाल व पत्नीचे नाव रिटा ठलाल असे लिहिल्याची बाब समोर आली. त्याने खोटे नाव देत दत्तक प्रक्रियेचे दस्तावेज तयार केले होते.

प्रजापतीचीच मुले आहेत का? पोलिसांकडून चौकशी

प्रजापतीचे २०१७ साली रिता डोंगरे हिच्यासोबत लग्न झाले होते. पाच वर्षांतच त्यांना पाच मुले-मुली झालेत. पोलिसांना यावर विश्वास बसणे कठीण झाले आहे. राजनांदगावमध्ये विक्री केलेला मुलगा स्वत:चा असल्याचा दावा प्रजापती करत असला तरी तो खरोखरच त्याचा मुलगा आहे का याचादेखील पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Prajapati's sale of his own son for 25 thousand; Adoption process using a false name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.