बालतस्करी रॅकेट; अपहरणातील आरोपींकडून अनेक मुलांची खरेदी- विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 09:36 PM2022-11-17T21:36:50+5:302022-11-17T21:41:45+5:30

Nagpur News डिप्टीसिग्नल येथील अपहरण नाट्यातील आरोपी योगेंद्र प्रजापती व त्याची पत्नी रिटा हे अनेक मुलांच्या खरेदी- विक्रीत सहभागी होते. नागपुरातदेखील हे रॅकेट सुरू होते.

Buying and selling of many children from accused in kidnapping | बालतस्करी रॅकेट; अपहरणातील आरोपींकडून अनेक मुलांची खरेदी- विक्री

बालतस्करी रॅकेट; अपहरणातील आरोपींकडून अनेक मुलांची खरेदी- विक्री

Next
ठळक मुद्देकथित सामाजिक कार्यकर्त्या महिलेलादेखील अटकप्राथमिक तपासात सहा मुलांची नावे उघड

नागपूर : डिप्टीसिग्नल येथील अपहरण नाट्यातील आरोपी योगेंद्र प्रजापती व त्याची पत्नी रिटा हे अनेक मुलांच्या खरेदी- विक्रीत सहभागी होते. नागपुरातदेखील हे रॅकेट सुरू होते. असेच आणखी एक रॅकेट उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कथित समाजसेविका राजश्री सेन हिला अटक केली आहे. राजश्रीने विकलेल्या नवजात बालकाची उस्मानाबादमधील तुळजापूर येथून सुटका करण्यात आली आहे.

प्रजापती दाम्पत्यासह श्वेता खान, फरजाना उर्फ असर कुरेशी, सीमा अन्सारी, बादल मडके आणि सचिन पाटील यांना कळमना येथे आठ महिन्यांच्या मुलाचे अपहरण करून अडीच लाख रुपयांना विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. प्रजापती दाम्पत्याला पाच मुले होती. दोन मुलगे त्यांच्यासोबत आढळले तर इतर दोन मुले व एका मुलीची त्यांनी दीड ते दोन लाखांत विक्री केली.

दोन्ही मुले भंडारा येथे तर मुलगी नागपुरात विकली गेली. भंडारा येथील एका मुलाला मुक्त केल्यानंतर पोलिसांनी मुलाच्या विक्रीचा गुन्हा दाखल करून तपासासाठी भंडारा पोलिसांकडे पाठवला आहे. तपासादरम्यान श्वेता खान, फरजाना उर्फ असर, सीमा परवीन, बादल मडके आणि सचिन पाटील यांनी अंबाझरी येथील एका मुलाला छत्तीसगडमधील तुळजापूर येथे विकल्याचे उघड झाले. या रॅकेटवर येत्या काही दिवसांत आणखी दोन गुन्हे दाखल होणार आहेत.

कळमना- अंबाझरी प्रकरणाच्या तपासादरम्यान एका खबऱ्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना शांतीनगर येथील रहिवासी राजश्री सेन हिने नवजात मुलाची विक्री केल्याची माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी मुलाला जन्म देणाऱ्या महिलेची चौकशी केली. तिने मुलगा विकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी राजश्री सेनला ताब्यात घेऊन तुळजापूर येथे छापा टाकला. तेथून नवजात बालकाची खरेदी करणाऱ्या आरोपी दाम्पत्याकडून सुटका करण्यात आली. ११ नोव्हेंबर रोजी नवजात बालकाचा जन्म झाला. दोन दिवसांपूर्वी त्याला तुळजापूर येथील एका जोडप्याला विकण्यात आले होते.

वर्षभरात १८ ठिकाणी आश्रय

प्रजापती दाम्पत्याने वर्षभरात १८ ठिकाणी आश्रय घेतला आहे. सर्व ठिकाणच्या पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून बेपत्ता मुलांच्या प्रकरणांचा तपास करण्यास सांगितले आहे. कळमन्यातील मूल विकत घेणारे जांभुळकर आणि त्याचे सासरे खोब्रागडे यांनादेखील आरोपी करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेली राजश्री सेन सुरुवातीला ब्युटीपार्लर चालवायची. अनेक राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी तिची विशेष ओळख होती.

दर दहा महिन्यांनी एका मुलाला जन्म

योगेंद्र प्रजापती याची पत्नी रिटाने मार्च २०१८ मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. पाचव्या क्रमांकाची मुलगी जून २०२२ मध्ये जन्मली आहे. ५१ महिन्यांत पाच बालकांचा जन्म झाला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, दर १० महिन्यांनी मुलाला जन्म देण्याच्या मुद्द्यावर पोलिसांकडून वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत आहे. प्रजापती दाम्पत्यासोबत सापडलेल्या दोन मुलांच्या पालकत्वावर त्यांना शंका आहे.

Web Title: Buying and selling of many children from accused in kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.