नागपूरसह १३ प्रमुख स्थानकांवर नाही मिळणार प्लॅटफॉर्म तिकीट; आजपासून विक्रीवर निर्बंध
By नरेश डोंगरे | Updated: December 4, 2025 20:43 IST2025-12-04T20:42:10+5:302025-12-04T20:43:08+5:30
Nagpur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नागपूरसह महाराष्ट्रातील १३ प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहे.

Platform tickets will not be available at 13 major stations including Nagpur; Sale restricted from today
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नागपूरसह महाराष्ट्रातील १३ प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहे. ५ ते ७ डिसेंबरपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मुंबईत पोहचण्यासाठी विविध रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी होते. अशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाला निघालेल्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी प्रवाशांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर येतात. त्यामुळे गर्दीत अधिक भर पडते आणि त्याचा त्रास प्रवाशांना होतो. सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो आणि प्रशासनावरही त्यामुळे ताण येतो.
दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई, नागपूर, नाशिकसह १३ प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार, शुक्रवारी ५ डिसेंबर ते रविवारी ७ डिसेंबरपर्यंत नागपूरसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर स्थानक, भुसावळ, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, अकोला, शेगाव, पाचोरा, बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार नाही.
यांना मात्र मिळणार सूट
वृद्ध तसेच ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, बालक, निरक्षर प्रवासी तसेच एकट्या प्रवास करू न शकणाऱ्या महिला प्रवासी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींना प्रवास सुलभ राहावा म्हणून या निर्बंधांमधून वगळण्यात आले आहे. या कालावधीत प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.