नागपूर-अमरावती महामार्गावर खड्ड्याने घेतला तरुणाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:22 IST2018-07-21T23:21:38+5:302018-07-21T23:22:13+5:30
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संतुलन बिघडल्याने मोटरसायकल दुभाजकाला धडकली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावर लिंबूवर्गीय कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

नागपूर-अमरावती महामार्गावर खड्ड्याने घेतला तरुणाचा जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संतुलन बिघडल्याने मोटरसायकल दुभाजकाला धडकली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावर लिंबूवर्गीय कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
धीरज रमेश फुसे (२५, आंबेडकरनगर, वाडी) असे मृताचे नाव आहे. तो नवीन मोटरसायकल (क्र. एमएच-३१/टीसी-००२६)ने वाडीकडून नागपूरकडे जात होता. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्याचे संतुलन बिघडले. त्यातच त्याची मोटरसायकल रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यामध्ये धीरज हा गंभीररीत्या जखमी झाला. तेथे हजर असलेल्या नागरिकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा प्रयत्न केला असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांंनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. खड्डे त्वरित न बुजविल्यास राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर विद्यापीठ परिसर (कॅम्पस्) ते नाका क्र. १० पर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावर सर्वत्र गिट्टी पसरली आहे. परिणामी दुचाकी चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेकदा यातूनच अपघाताच्या घटना घडल्या. त्यानंतरही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यातच शनिवारी खड्ड्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागला. आतातरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्याची डागडुजी करणार काय की आणखी अपघातांची प्रतीक्षा करणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.