विदर्भातील लोकांना थायलंडमध्ये प्रशिक्षणाची संधी ! थायलंडच्या धम्मकाया विद्यापीठाचे केंद्र शांतिवन चिचोलीत होणार
By आनंद डेकाटे | Updated: December 5, 2025 17:47 IST2025-12-05T17:39:15+5:302025-12-05T17:47:57+5:30
Nagpur : भंते किट्टीपोंग यांनी सांगितले की, बौद्ध धम्म हा जगभरात पसरलेला आहे. प्रत्येक देशात बौद्ध धम्माचे अनुयायी हे आपापल्या पद्धतीने बुद्धाचे विचार तत्वज्ञान मांडत असतात.

People of Vidarbha get training opportunity in Thailand! Thailand's Dhammakaya University center to be set up in Shantivan Chicholi
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थायलंड येथील जगविख्यात धम्मकाया फाऊंडेशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या धम्मकाया ओपन युनिर्व्हसिटीचे एक उपकेंद्र नागपुरातील शांतिवन चिचोली येथे सुरू करण्यात येत असल्याची माहिती धम्मकाया फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय संबंध प्रमुख भंते किट्टीपोंग हेमवामसो यांनी शुक्रवारी शांतिवन चिचोली येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी शांतिवन चिचोलीचे विश्वस्त संजय पाटील उपस्थित होते.
भंते किट्टीपोंग यांनी सांगितले की, बौद्ध धम्म हा जगभरात पसरलेला आहे. प्रत्येक देशात बौद्ध धम्माचे अनुयायी हे आपापल्या पद्धतीने बुद्धाचे विचार तत्वज्ञान मांडत असतात. परंतु बुद्धाचे विचार हे एकच आहे. बुद्धांचे ते मुळ विचार लोकांपर्यंत जाण्यासाठी जगभरातील बौद्धांची एकच संस्कृती निर्माण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने धम्मकाया फाऊंडेशन कार्य करीत आहे. धम्मकाया फाऊंडेशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या धम्मकाया ओपन युनिर्व्हसिटीमध्ये बौद्ध धम्माच्या संबंधितविविध अभ्यासक्रम शिकवले जातात. ते अभ्यासक्रम आता शांतिवन चिचोलीमध्ये सुद्धा शिकवले जातील. यात वयाचे कुठलेही बंधन नाही. नागपूर विदर्भातील लोकांना थायलंडमध्ये सुद्धा अभ्यासक्र किंवा प्रशिक्षणाची संधी मिळेल. पत्रपरिषदेला शशिकांत राऊत, मंगेश बागडे, रेखा मून आदी उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज भव्य अभिवादन
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे शांतिवन चिचोली येथे भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली. याप्रसंगी थायलंडचे भंते किट्टीपोंग हेमवामसो, भंते पासुरा दंतमनो, डाॅ. संजय रामटेके मुख्य अतिथी राहतील. इंडियन बुद्धिस्ट कौन्सिलचे विश्वस्त चंद्रशेखर गोडबोले हे अध्यक्षस्थानी राहतील. दुपारी १२ वाजता धम्मदेसनेचा कार्यक्रम होईल. दुपारी २ वाजता अविनाश दुपारे यांचे संगीतमय अभिवादन होईल. सायंकाळी ५.३० वाजता कॅंडलमार्च निघेल.
रविवारी विशेष फुलपूजा
थायलंडमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी विशेष अमिस पूजा म्हणजे फुलपूजा केली जाते. या रविवारी ७ डिसेंबर रोजी सुद्धा ही विशेष फुलपूजा केली जाणार असून त्याचवेळी ती जगभरात सुद्धा एकाच वेळी केली जाईल. शांतिवन चिचोली येथे रविवारी सकाळी ८ ते सकाळी ९.३० वाजेपर्यंतही फलपूजा चालेल.