घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST2021-01-08T04:23:10+5:302021-01-08T04:23:10+5:30
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील केंद्र व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याकरिता पंचायत समितीने ५० ग्रामपंचायतीसाठी ...

घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती यंत्रणा सज्ज
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील केंद्र व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याकरिता पंचायत समितीने ५० ग्रामपंचायतीसाठी चार नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती गटविकास अधिकारी महेश्वर डोंगरे यांनी मंगळवारी दिली.
तालुक्यात ५० ग्रामपंचायतींअंतर्गत एकूण २२४३ घरकुलांचे लक्ष्यांक मिळाले आहे. त्यांपैकी १८३६ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यातून आजपर्यंत ७२३ घरकुल पूर्ण झाले आहेत. तालुक्यामध्ये महाआवास अभियान (ग्रामीण) २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविले जात आहे. यात तालुक्यातील अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण करणे, घरकुलांना १०० टक्के मंजुरी देणे, करारनामा करणे, जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमण नियमित करणे, इत्यादी कामे वेळेमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे.
याकरिता कनिष्ठ अभियंता सतीश अकर्ते यांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच ५० ग्रामपंचायतींची चार भागांत विभागणी करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीमधील घरकुलांना वेळोवेळी भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेणे व अपूर्ण घरकुल वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी शाखा अभियंता पी. आर. खवले, कनिष्ठ अभियंता प्रशांत कुंटे, कनिष्ठ अभियंता एस. आर. अकर्ते, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक मंगेश गणवीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.