नागपूर व मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत आमची मैत्री पक्की ! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:02 IST2025-12-17T12:59:38+5:302025-12-17T13:02:04+5:30
Nagpur : आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपचा शिवसेनेसोबत युतीचा निर्णय झाला आहे. नागपूर व मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत आमची अगोदरपासून नैसर्गिक मैत्री आहे.

Our friendship with Shiv Sena in Nagpur and Mumbai Municipal Corporation is solid! Revenue Minister Chandrashekhar Bawankule clarified
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपचा शिवसेनेसोबत युतीचा निर्णय झाला आहे. नागपूर व मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत आमची अगोदरपासून नैसर्गिक मैत्री आहे. त्यामुळे जिथे भाजप मजबूत आहे तेथे शिवसेनेला व जिथे शिवसेना मजबूत आहे तेथे भाजपला सोबत घेऊन निवडणूक लढविण्यात येतील, हा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नागपुरात ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काही ठिकाणी पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक येथे भाजप-शिवसेनेची बोलणी सुरू झाली आहे. शिवसेनेसोबत जागावाटपाबाबत चर्चा झाल्यानंतर महायुतीतील इतर घटकपक्षांशी चर्चा करण्यात येईल. अमरावतीमध्ये महायुती एकत्रित लढेल. रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष अनेक वर्षांपासून भाजपसोबत आहे. ते निश्चित महायुतीत असतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंना प्रमोट करण्यात नवीन काय ?
उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केले होते. आतादेखील तेच सुरू आहे. त्यात नवीन काय आहे, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.
अजित पवारांचा निर्णय तेच घेतील
अजित पवार यांना त्यांचा पक्ष कसा चालवायचा, निवडणूक कशी जिंकायची याचे नियोजन करण्याचा अधिकार आहे. निवडणूक निवडणुकीच्या तत्त्वांवर लढावी लागते. त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी काय केले यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय, याचे नियोजन जास्त आवश्यक आहे, असे बावनकुळे म्हणाले.
जनाधार संपल्यानेच उद्धव-राज एकत्र
मुंबईत उद्धव ठाकरे व राज ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र येतील, हे चांगले समीकरण आहे. ते का एकत्र येतात, हे लोकांना चांगल्या तन्हेने माहीत आहे. जनाधार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होतात. ठाकरेंकडे 'व्हिजन' काय आहे व इतकी वर्षे त्यांच्याकडे मुंबईचा महापौर होता, त्यांनी काय केले? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.