आरटीओसमोर आॅटोचालकांची निदर्शने

By Admin | Updated: April 8, 2016 03:12 IST2016-04-08T03:12:28+5:302016-04-08T03:12:28+5:30

महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा करून शासनाने नवी अधिसूचना काढत वाहन परवाना शुल्कात १० ते १०० पट वाढ केली.

Opponents of autorickshaws in front of RTO | आरटीओसमोर आॅटोचालकांची निदर्शने

आरटीओसमोर आॅटोचालकांची निदर्शने

नागपूर : महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा करून शासनाने नवी अधिसूचना काढत वाहन परवाना शुल्कात १० ते १०० पट वाढ केली. ही वाढ आॅटोचालकांचे कंबरडे मोडणारी आहे. शासनाने हा अध्यादेश मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तीन सिटर आॅटोरिक्षा चालक संघर्ष समितीने गुरुवारी आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने करून दिला.
समितीचे कोषाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले, आॅटोरिक्षा चालकांची आर्थिक व व्यवसायिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. यातच अवैध प्रवासी वाहतुकीमुळे आॅटोचालकांना प्रवासी मिळणे कठीण जात आहे. ई-रिक्षा, कॅब, सहा आसनी आॅटोरिक्षा व खासगी आॅटोरिक्षामुळे अधिकृत आॅटोचालकांना आॅटोरिक्षा चालविणे कठीण झाले आहे. यातच नव्या अध्यादेशानुसार आता पूर्वी आॅटोरिक्षा परवान्याच्या नुतनीकरणाला २०० रुपये शुल्क आकारले जायचे ते आता नव्या आदेशाप्रमाणे १००० रुपये झाले आहे. मासिक दंडाचे १०० रुपये शुल्क असताना ते ५००० रुपये दंड निर्धारीत करण्यात आला आहे. परमिट न घेणाऱ्यांना पूर्वी २०० रुपये शुल्क होते ते आता १० हजार रुपये करण्यात आले आहे. हा अध्यादेश आॅटोचालकांवर अन्याय करणार आहे. शासनाने या अधिसूचनेतून आम्हाला वगळावे, अशी मागणी आहे.
दरम्यान समितीच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी.टी. पवार यांना निवेदन देऊन सात दिवसांत योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला. कार्यालयाच्या बाहेर आॅटोरिक्षाचालकांनी नारे-निदर्शने केली. शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष धर्माजी बागडे, भरत लांडगे, हरिश्चंद्र पवार, मोहन बावने, सुनील ठवरे, अमृत गजभिये आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

Web Title: Opponents of autorickshaws in front of RTO