‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
By योगेश पांडे | Updated: May 8, 2025 00:33 IST2025-05-08T00:31:44+5:302025-05-08T00:33:09+5:30
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर राबवत असताना नागरी वस्त्यांमध्ये थेट नुकसान न होता, केवळ दहशतवाद्यांच्या कॅम्प्सला टार्गेट करण्याचे मोठे आव्हान वायुदलासमोर होते. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या आधारे वायुदलाच्या वैमानिकांनी ते सहज शक्य करून दाखविले.

‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
- योगेश पांडे
नागपूर - ऑपरेशन सिंदूर राबवत असताना नागरी वस्त्यांमध्ये थेट नुकसान न होता, केवळ दहशतवाद्यांच्या कॅम्प्सला टार्गेट करण्याचे मोठे आव्हान वायुदलासमोर होते. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या आधारे वायुदलाच्या वैमानिकांनी ते सहज शक्य करून दाखविले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘एलएमएस’चा (लॉईटरिंग म्युनिशन्स सिस्टम) वापर झाला. त्यामुळे थेट टार्गेटला नेस्तनाबूत करण्यात यश आले. भारतीय सैन्याला नागपुरातूनदेखील या ‘एलएमएस’चे बळ मिळते व नागास्त्र-१ च्या प्रणालीचा यात उपयोग करण्यात आल्याची दाट शक्यता आहे. गोपनीयता बाळगायची असल्याने संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.
नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजच्या ‘इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड’द्वारे ‘एलएमएस’चे उत्पादन होते. भारतीय सैन्याच्या शस्त्रसामुग्रीत ‘नागास्त्र-१’ व ‘नागास्त्र-२’चा समावेश आहे. आत्मघाती ड्रोन अशी यांची ओळख असून याचा उपयोग अशा ऑपरेशन्समध्ये हमखास करण्यात येतो. ही मानवरहित ड्रोन्स टार्गेट भागाची टेहळणी करण्यासाठी, समोरील धोके ओळखण्यासाठी व वेळ पडली तर पारंपरिक क्षेपणास्त्रांप्रमाणे टार्गेट उडविण्यासाठीदेखील याचा उपयोग केला जाऊ शकतो. ‘नागास्त्र-१’ व ‘नागास्त्र-२’मुळे प्रत्यक्ष ऑपरेशन्सदरम्यान नुकसान होण्याचा धोका कमी होतो. या ‘एलएमएस’ प्रणालीला कॅमिझाके ड्रोन अशीदेखील ओळख आहे. भारतीय सैन्यदलात पोलंडच्या डब्लूबी ग्रुपचे वॉरमेट तसेच नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजच्या नागास्त्र-१ चा शस्त्रसामुग्रीत समावेश केला आहे. त्याचाच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापर झाल्याची दाट शक्यता असल्याची माहिती संरक्षण तज्ज्ञांनी दिली आहे.
‘नागास्त्र-१’मध्ये ‘मेड इन इंडिया’ तंत्रज्ञान
सोलार इंडस्ट्रीजतर्फे उत्पादित ‘नागास्त्र-१’च्या माध्यमातून ‘रिअल टाईम’ टेहळणी शक्य होते. त्याचप्रमाणे यात स्फोटकांचे पेलोडदेखील वाहून नेण्याची क्षमता आहे. २०२४ मध्ये सोलार इंडस्ट्रीजने भारतीय लष्करासोबत चारशेहून अधिक ‘नागास्त्र-१’चा पुरवठा करण्याचा करार केला होता.
‘नागास्त्र-१’ची क्षमता
- नागास्त्र-१ अत्यंत थंड किंवा जास्त उंचीच्या परिस्थितीतही काम करण्यास सक्षम आहे.
- या ड्रोनची रेंज सुमारे ३० किमी आहे
- त्याच्या इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टममुळे, नागास्त्र-१ चे ध्वनी संकेत कमी आवाजाचे आहेत.
- हे ड्रोन दिवसा आणि रात्री देखरेख कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे
- लहान टार्गेट्सना निष्प्रभ करण्यासाठी एक ते दीड किलो वजनाचे स्फोटक वॉरहेड वाहून नेऊ शकते.
- मोहीम रद्द झाली तर पॅराशूट रिकव्हरी सिस्टम वापरून सहज खाली उतरवता येते
- नागास्त्र-१ मधील बहुतांश साहित्य स्वदेशी