नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांनी आधी स्कुटर चालविली तर बघणारे डोळे विस्फारत असे. आर्चीने मात्र बुलेट सोबत ट्रॅक्टर चालविण्याचा ट्रेंड सेट केला. तत्पूर्वीच अनेक महिला-मुलींनी विमान, बसच नव्हे तर एकाच वेळी हजारो प्रवाशांना प्रवास घडविणाऱ्या रेल्वेचे स्टेअरिंगही हाती घेतले होते. आता नागपुरातील एक अख्खे रेल्वे स्थानकच महिला चालवितात.
होय, हे खरे आहे. पुढच्या काही महिन्यातच वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन म्हणून ज्या स्थानकाचा गाैरव होणार आहे, त्या अजनी रेल्वे स्थानकाचे संपूर्ण व्यवस्थापक सध्या महिला-मुली करतात आहे.
उपराजधानीच्या मध्य भागी असलेल्या अजनी रेल्वे स्थानकावरून रोज १२५ गाड्यांचे संचालन होते. त्यातून हजारो प्रवासी जाणे-येणे करतात. येथील वैशिष्ट्य असे की, रेल्वे गाड्यांचे संचालन, प्रवाशांशी संबंधित व्यवहार आणि या संपूर्ण रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापन १५८१ महिला-मुली सांभाळतात. त्यांचे नेतृत्व स्टेशन मॅनेजर म्हणून महिला करतात. बुकिंग क्लर्क, तिकिट चेकिंगच नव्हे तर पार्सल, मेकॅनिकल, इजिनिअरिंग आणि सुरक्षा दलाचा स्टाफही महिला हाताळतात.
मध्य रेल्वेत तीन स्थानके
अशा प्रकारे रेल्वे स्थानकांचा कारभार यांच्या हातात आहेत, त्यात मध्य रेल्वेचे महाराष्ट्रात तीन स्थानकं आहेत. माटूंगा, मुंबई, अजनी नागपूर आणि न्यू अमरावती, ही ती स्थानके होय.
प्रचंड गर्दी अन् नियोजनअजनी रेल्वे स्थानकावर दसरा सणाच्या अर्थात दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रचंड गर्दी होते. देशभरातील विविध प्रांतातून येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी येतात. त्यावेळी गाड्यांचीही संख्या वाढते. अशा वेळी येथील लेडिज आर्मी गाड्यांसोबतच गर्दीचेही यशस्वी संचालन करून कसलाही गडबड गोंधळ होऊ देत नाही.
अधिकारी म्हणतात...या संबंधाने मध्य रेल्वेच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते 'अजनीच्या लेडिज आर्मी'बद्दल काैतुकाचा अभिप्राय नोंदवितात. अतिशय प्रशंसनीय आणि अनुकरणीय काम करतात. त्यांची जेवढी प्रशंसा करावी तेवढी थोडीच असल्याचे मत वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल नोंदवितात.