राज्यात केवळ १ टक्काच वाहनांना लागली 'एचएसआरपी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:16 IST2025-03-21T11:13:20+5:302025-03-21T11:16:29+5:30

२०१९ पूर्वीची २ कोटी ६९ लाख वाहने : जून महिन्यापर्यंत वाढली प्रतीक्षा

Only 1 percent of vehicles in the state have 'HSRP' | राज्यात केवळ १ टक्काच वाहनांना लागली 'एचएसआरपी'

Only 1 percent of vehicles in the state have 'HSRP'

सुमेध वाघमारे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) लावण्यासाठी ३० एप्रिल शेवटची तारीख असताना राज्यातील जवळपास २ कोटी ६९ लाख वाहनांपैकी आतापर्यंत केवळ १ टक्के वाहनांनाच ही नंबरप्लेट लागली आहे. यावरून वाहनमालकांमध्ये एचएसआरपी' लावण्याबाबतची उदासीनता दिसून येत आहे. 


वर्ष २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील सर्व वाहनांना 'एचएसआरपी' लावणे बंधनकारक करण्यात आले. एक मेपासून ज्यांच्या वाहनावर ही नंबरप्लेट नसेल अशा वाहनांवर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या दंडाचा भुर्दंड टाळण्यासाठी अनेक वाहनचालक धडपड करताना दिसून येत असले तरी प्रत्यक्षात आकडेवारी वेगळेच काही सांगत आहे. १ जानेवारीपासून ही नंबरप्लेट लावण्याची मोहीम सुरू झाली असली तरी १८ मार्चपर्यंत राज्यात जवळपास २ लाख ८२ हजार ४५७वाहनांनाच नंबरप्लेट लागली आहे. 


९९ हजार वाहनांचे बुकिंग
नागपुरातील तिन्ही आरटीओ कार्यालये मिळून १८ मार्चपर्यंत एचएसआरपी लावण्यासाठी जवळपास ९९ हजार वाहनांचे बुकिंग झाले आहे; परंतु १६ हजार १६७ वाहनांनाच 'एचएसआरपी' लावण्यात आले आहे. उर्वरित ८२ हजार ८३३ वाहनांना एचएसआरपी लावण्यासाठी कोणाला मे, तर कोणाला जून महिन्यापर्यंतची तारीख मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.


जनजागृतीच्या अभावाचा फटका
'एचएसआरपी' लावण्यामागील उदासीनतेमागील कारण स्पष्ट करताना या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले, 'एचएसआरपी' लावण्याबात अद्यापही हवी तशी जनजागृती झालेली नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात 'एचएसआरपी'चे शुल्क दुप्पट आकारले जात असल्याने वाहनमालकंमध्ये नाराजीचे वातावरण आहे. फिटमेंट सेंटरची संख्याही कमी आहे. केवळ ऑनलाइन बुकिंगद्वारेच 'एचएसआरपी' लावता येत असल्याने सामान्य माणूस यापासून दूर आहे.


नागपुरात केवळ ७६ फिटमेंट सेंटर
नागपुरातील तिन्ही आरटीओ कार्यालये मिळून जवळपास २२ लाख ७२ हजार जुने वाहन असताना यांना एचएसआरपी नंबर लावण्यासाठी केवळ ७६ फिटमेंट सेंटर आहेत. यात नागपूर शहर आरटीओअंतर्गत (एमएच ३१) 'रोस्मर्टा सेफ्टी सीस्टिम'चे ३१ फिटमेंट सेंटर, पूर्व नागपूर आरटीओअंतर्गत (एमएच४९) 'रोस्मर्टा सेफ्टी सिस्टिम'चे २९ फिटमेंट सेंटर, तर नागपूर ग्रामीण आरटीओअंतर्गत (एमएच ४०) येणाऱ्या वाहनांना 'रिअलमॅझॉन इंडिया लि.' एजन्सीचे केवळ १६ फिटमेंट सेंटर आहेत.


'एचएसआरपी'साठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
नागपूर : 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) लावण्याची मुदत आता ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आल्याने जुन्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भातील परिपत्रक परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी गुरुवारी काढले.


१८ मार्चपर्यंत नागपूरची स्थिती
आरटीओ : एमएच ३१
एकूण ऑडर्स : ३६,८५४
एकूण अपॉइंमेंट : ११,५२४
एचएसआरपी लावण्यात आलेली वाहने : ७,४५७
आरटीओ : एमएच ४९
एकूण ऑडर्स : २९,३१६
एकूण अपॉइंटमेंट : ७,०९०
एचएसआरपी लावण्यात आलेली वाहने : ४,३१९
आरटीओ : एमएच ४०
एकूण ऑडर्स :३२,९३५
एकूण अपॉइंटमेंट : ३२,९३५
एचएसआरपी लावण्यात आलेली वाहने : ४,३९१

Web Title: Only 1 percent of vehicles in the state have 'HSRP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.