'बार्टी 'मार्फत जेईई आणि नीटच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु
By आनंद डेकाटे | Updated: July 3, 2025 20:01 IST2025-07-03T20:00:39+5:302025-07-03T20:01:08+5:30
नागपूरसह मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर या शहरात प्रशिक्षण : ३० जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Online process for JEE and NEET coaching started through 'Barti'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षांचे नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. बार्टीमार्फत नागपूरसह मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर या ठिकाणी प्रत्येकी जेईई-१०० आणि नीट-१०० जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी इयत्ता ११ (विज्ञान) शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याजवळ महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा व अधिवास दाखला असावा. कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या घरात असावे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.
जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी नमुद केल्याप्रमाणे महिला ३० टक्के, दिव्यांग (पीडब्ल्यूडी) ५ टक्के, अनाथ १ टक्के, वंचित ५ टक्के जागा आरक्षित असतील. प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निहाय उमेदवारांची निवड करण्यात येईल.
प्रशिक्षणाचा कालावधी २४ महिन्यांचा असणार आहे. प्रशिक्षण काळात ७५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती राहिल्यास विद्यार्थ्यांना दरमहा ६ हजार रूपये एवढे विद्यावेतन दिल्या जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी ५ हजाररूपये एवढी एकरकमी रक्कम अदा करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० जुलै आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी https://cpetp.barti.in या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन महासंचालक बार्टी मार्फत करण्यात आले आहे.