‘ऑनलाइन फ्रॉड्स’मध्ये वर्षभरातच २५ टक्के, तर पाच वर्षांत ८१४ टक्क्यांनी वाढ; नागरिकांनी गमावले साडेबावीस हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 01:42 IST2026-02-13T01:41:07+5:302026-02-13T01:42:15+5:30
बँकांच्या सहकार्यातून सुरक्षायंत्रणांना मिळाला २१ लाख संशयितांचा डाटा...

‘ऑनलाइन फ्रॉड्स’मध्ये वर्षभरातच २५ टक्के, तर पाच वर्षांत ८१४ टक्क्यांनी वाढ; नागरिकांनी गमावले साडेबावीस हजार कोटी
नागपूर : देशात ‘डिजिटल इंडिया’च्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार झपाट्याने वाढले असले तरी त्याच वेगाने सायबर गुन्हेगारीदेखील वाढताना दिसत आहे. गेल्या एका वर्षात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली असून, मागील पाच वर्षांत तब्बल ८१४ टक्क्यांनी तक्रारी वाढल्या आहेत. मागील वर्षभरातच देशभरातील नागरिकांनी सायबर फसवणुकीमुळे साडेबावीस हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम गमावली आहे.
सर्वसाधारणत: आर्थिक फसवणूक झाल्यावर नागरिक ‘एनसीआरपी’वर (नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टल) तक्रारी करतात. ‘लोकमत’ला मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २०२५ मध्ये ‘एनसीआरपी’वर तब्बल २४ लाख २ हजार ५७९ तक्रारी झाल्या. नागरिकांच्या तक्रारीनुसार सायबर गुन्हेगारांनी त्यांचे २२ हजार ४९५ कोटी रुपये गिळंकृत केले. २०२४ मध्ये तक्रारींचा आकडा १९ हजार १८ हजार ८३५ इतका होता व त्यात नागरिकांनी २२ हजार ८४८ कोटी रुपये गमावले होते. वर्षभरातच तक्रारींमध्ये २५ टक्के वाढ झाली.
डिजिटल पेमेंट, नेट बँकिंग, यूपीआय, क्रेडिट-डेबिट कार्ड व्यवहार तसेच विविध मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर सायबर चोरट्यांची थेट नजर आहे. बनावट लिंक, फसवे कॉल, केवायसी अपडेटच्या नावाखाली पाठवले जाणारे संदेश, तसेच ‘लॉटरी जिंकली’, ‘बँक खाते ब्लॉक होणार’ अशा भीतिदायक किंवा आकर्षक संदेशांच्या जाळ्यात अडकवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.
१२ लाखांहून अधिक सिमकार्ड्स ब्लॉक -
सायबर गुन्हेगारांकडून रॅकेट चालवत असताना मोठ्या प्रमाणात सिमकार्ड्स व फोन्सची खरेदी होते. विविध लोकांच्या दस्तावेजांवर हे सिमकार्ड्स असतात व त्यांचा उपयोग ‘प्रोफेसर गँग’सारख्या आंतरराष्ट्रीय गँग्जकडून लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी करण्यात येतो. नागरिकांच्या तक्रारीनंतर अशा प्रकारची १२.२१ लाख सिमकार्ड्स ब्लॉक करण्यात आली आहेत, तर ३.०३ लाख फोनच्या आयएमईआयलादेखील ब्लॉक करण्यात आले आहे.
२६ लाख ‘म्युअल’ खात्यांचा शोध -
सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांकडून उकळलेले पैसे विविध बँक खात्यांच्या माध्यमातून वळविण्यात येतात. यासाठी अनेक गरीब नागरिकांच्या दस्तावेजांचा वापर करून परस्पर त्यांचे बँक खाते वापरण्यात येते. सुरक्षायंत्रणांनी अशा प्रकारच्या २६ लाख ‘म्युअल’ खात्यांचा शोध लावला आहे. त्यातील ९०५५ कोटींची रक्कम गोठविण्यात आली आहे. याशिवाय बँक व वित्तीय संस्थांच्या सहकार्याने गृहमंत्रालयाने संशयितांना शोधण्याची प्रणाली विकसित केली आहे. त्याअंतर्गत सप्टेंबर २०२४ पासून आतापर्यंत २१.६५ लाख संशयितांचा डेटा सुरक्षायंत्रणांना प्राप्त झाला आहे.
‘एनसीआरपी’कडील वर्षनिहाय तक्रारी
वर्ष : तक्रारी : फसवणुकीची रक्कम (कोटींमध्ये)
२०२१ : २,६२,८४६ : ५५१
२०२२ : ६,९४,४४६ : २,२९०
२०२३ : १३,१०,३५७ : ७,४६५
२०२४ : १९,१८,८३५ : २२,८४८
२०२५ : २४,०२,५७९ : २२,४८५