महापालिकेत पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 09:20 PM2019-12-19T21:20:32+5:302019-12-19T21:22:48+5:30

राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आता पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले.

A one-member ward system again in the municipality | महापालिकेत पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पद्धत

महापालिकेत पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पद्धत

Next
ठळक मुद्दे नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित करणे सोपे होणार : कमी क्षेत्रामुळे विकासाला चालना मिळेल

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आता पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने हा निर्णय बदलविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधीचे सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचे विधेयक विधानसभेत सादर केले. हे विधेयक मंजूर होताच राज्यातील सर्व महापालिकांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. मुंबई महापालिकेत सद्यस्थितीत एक सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आहे, हे विशेष. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार रचना केल्यामुळे प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र भरपूर मोठे झाले होते. एवढा मोठा भूभाग असल्यामुळे एका टोकावरील नगरसेवकाला दुसऱ्या टोकावरील नागरिकाशी संपर्क साधण्यात, त्याचे प्रश्न सोडविण्यात अडचणी जात होत्या. शिवाय एका प्रभागात चार नगरसेवक असल्यामुळे कामाची जबाबदारी निश्चित होत नव्हती. नगरसेवकांकडून जनतेची कामे करताना टोलवाटोलवी व्हायची.
प्रभागातील चारही नगरसेवक एकाच पक्षाचे असतील तर त्यांनी एरियानुसार प्रभाग आपापसात वाटून घेतले होते. मात्र, जेथे एका प्रभागात दोन किंवा त्यापेक्षा अधिक पक्षांचे नगरसेवक विजयी झाले आहेत तेथे विकास कामांवरून सातत्याने वाद होत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महापालिकेच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली होती. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये उमेदवारासोबतच पक्षाला अधिक महत्त्व मिळत होते. या पद्धतीचा भाजपला राज्यात सर्वत्र फायदाही झाला. पक्षाच्या ताकदीच्या बळावर बहुतांश महापालिका ताब्यात घेण्यात तसेच आपला ग्राफ वाढविण्यात भाजपला यश आले. तेव्हापासूनच काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबद्दल अस्वस्थता होती. ही पद्धत रद्द करून जुन्या वॉर्ड पद्धतीच्या धर्तीवर एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात त्या दिशेने पाऊल टाकत सरकारने तिन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना दिलासा दिला आहे.
नागपूर महापालिकेत ३८ प्रभाग आहेत. यापैकी एकूण ३७ प्रभागात प्रत्येकी ४ नगरसेवक होते. तर शेवटच्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये ३ नगरसेवक होते.

Web Title: A one-member ward system again in the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.