बँकांमध्ये ३६ हजार कोटींची एक लाख ७९ फसवणुकीची प्रकरणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:17 IST2025-07-18T16:12:41+5:302025-07-18T16:17:37+5:30
रिझर्व्ह बँकेने माहिती केली उघड : आर्थिक वर्ष २०२४-२५

One lakh 79 fraud cases worth Rs 36 thousand crores in banks
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशातील विविध बँकांमध्ये ३६,३६१ कोटी रुपयांची १.७९ लाख फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. अभय कोलारकर यांनी माहिती अधिकार (आरटीआय) अंतर्गत दाखल केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने उघड केली. त्यांना प्राप्त माहितीत फसवणुकीची संख्या आणि त्यात समाविष्ट असलेल्या रकमेचा बँकनिहाय आढावा देण्यात आला. ही आकडेवारी भारताच्या बँकिंग व्यवस्थेतील असुरक्षितता दर्शविते. आर्थिक फसवणूक थांबविण्यासाठी कठोर नियामक देखरेख आणि बँकांचे रिअल-टाइम ऑडिट करण्याची आवश्यक असल्याचे कोलारकर म्हणाले.
गत आर्थिक वर्षात देशातील आघाडीच्या बँकांमध्ये अॅक्सिस बँकेत ७९,६२९ प्रकरणांमध्ये ९८६.४६ कोटींची फसवणूक झाली. एचडीएफसी बैंक लिमिटेडमध्ये ३९,८२२ प्रकरणांमध्ये ७१५.९६ कोटी, एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेड १९,८३८ प्रकरणांमध्ये ७५.२६ कोटी, आयसीआयसीआय बँक लिमिटेड १३,५३२ प्रकरणे ६०८.९४ कोटी आणि आरबीएल बैंक लिमिटेड ८,६१० प्रकरणांमध्ये ६८.२७ कोटींची फसवणूक झाल्याची नोंद आहे.
आघाडीच्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) १३,८३५ प्रकरणांमध्ये ७,७००.४४ कोटी, आयडीबीआय बँक लिमिटेड ४३० प्रकरणे ६,१२९.५७ कोटी, कॅनरा बँक ५४२ प्रकरणे ४,९५१.६९ कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया २८० प्रकरणे ३,७८२.९७ कोटी, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) २,९७९ प्रकरणे ३,७८२.९७कोटी, इंडियन बँक २,१७१ प्रकरणे २,११४.११ कोटी आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये २९२ प्रकरणांमध्ये ९४२.४३ कोटींची फसवणूक झाली.
याशिवाय बँक ऑफ इंडियामध्ये १५३ प्रकरणांमध्ये ७,४४९.३६ कोटी, येस बँक २,८१४ प्रकरणांमध्ये ३८८.०२ कोटी, कर्नाटक बँक २२१ प्रकरणांमध्ये ३४८.९४ कोटी, फेडरल बँक ३,८०३ प्रकरणांमध्ये ७९.७५ कोटी आणि जम्मू आणि काश्मीर बँकेत ३५ प्रकरणांमध्ये १९८.१७ कोटींची फसवणूक झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली. ही आर्थिक फसवणूक निश्चित कोणत्या तारखेला झाली, याची माहिती नसल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले. परंतु, ही फसवणूक गेल्या आर्थिक वर्षांत झाली. या आर्थिक घोटाळ्यावर सर्व स्तरांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.