दळवळणासाठी ‘एक देश, एक कार्ड’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 20:29 IST2019-03-07T20:18:39+5:302019-03-07T20:29:09+5:30
देशातील दळणवळणाच्या क्षेत्राच्या विस्तार होत असून भविष्याची आवश्यकता लक्षात घेऊन यात झपाट्याने बदल होत आहे. देशातील वाहतुकीची गरज लक्षात घेता दळणवळणासाठी ‘एक देश, एक कार्ड’ प्रणाली सुरू करण्यात येत आहे. हे एकच ‘कार्ड’ रेल्वे, बस, मेट्रो, स्थानिक सार्वजनिक वाहतूक, टोल इत्यादी ठिकाणी वापरता येईल, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३.५ कि़मी. पहिल्या टप्प्याचे नवी दिल्ली येथून व्हिडिओ लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील दळणवळणाच्या क्षेत्राच्या विस्तार होत असून भविष्याची आवश्यकता लक्षात घेऊन यात झपाट्याने बदल होत आहे. देशातील वाहतुकीची गरज लक्षात घेता दळणवळणासाठी ‘एक देश, एक कार्ड’ प्रणाली सुरू करण्यात येत आहे. हे एकच ‘कार्ड’ रेल्वे, बस, मेट्रो, स्थानिक सार्वजनिक वाहतूक, टोल इत्यादी ठिकाणी वापरता येईल, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.
वर्धा रोडवरील ‘एअरपोर्ट साऊथ स्टेशन’वर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी नवी दिल्ली येथून ‘मेट्रो’ला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, राज्याचे उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, केंद्रीय नगरविकास सचिव दुर्गाशंकर मिश्र, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. ‘एक देश, एक कार्ड’ प्रणाली फारच कमी देशात कार्यान्वित आहे. विविध शहरांमध्ये एकाच ‘कार्ड’च्या माध्यमातून प्रवास करता येईल. तसेच या ‘कॉमन मोबिलीटी कार्ड’च्या माध्यमातून खरेदीदेखील करता येणार आहे. ‘स्मार्ट’ व्यवस्थेच्या माध्यमातून विकासाला चालना देणारे ‘एक्सप्रेस कार्ड’ असेल. सामान्य जनतेची सुविधा लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
संत्र्याप्रमाणे ‘माझी मेट्रो’ प्रसिद्ध होईल
यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात व शेवट मराठीतून केला. नागपुरची संत्री जशी जगप्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे ‘माझी मेट्रो’देखील नागपुरची ओळख बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०५० पर्यंत नागपुरची लोकसंख्या दुप्पट होईल. अशा स्थितीत वाहतूक व्यवस्था आधुनिक व्हायला हवी. यासाठी निरंतर प्रयत्नांची आवश्यकता आहे. नागपूरची ‘मेट्रो’ ही ‘ग्रीन मेट्रो’ ठरणार आहे. ‘मेट्रो’मुळे शहरांचा विस्तार होतो व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होते. नागपुरच्या रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होईल व प्रदुषणाची पातळीदेखील घटेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
२०१४ नंतर देशभरात ‘मेट्रो’च्या कामाला वेग
२०१४ च्या अगोदर देशात ‘मेट्रो’चे ‘नेटवर्क’ २५० किमीचेच होते. मात्र ‘मजबूर’ ऐवजी ‘मजबूत’ सरकार आले आणि त्यानंतर हा आकडा ६५० किमीवर पोहोचला आहे. याशिवाय देशातील विविध भागात ८०० किमीच्या ‘मेट्रो’ मार्गांचे काम सुरू आहे, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी कुणाचेही नाव न घेता विरोधकांना अप्रत्यक्षपणे चिमटे काढले.