धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गावोगावी पोहोचला सुरक्षित प्रवासाचा संदेश
By सुमेध वाघमार | Updated: October 3, 2025 18:00 IST2025-10-03T17:58:25+5:302025-10-03T18:00:12+5:30
Nagpur : सुमारे दहा हजार नागरिकांनी या उपक्रमाला भेट देऊन सुरक्षित प्रवासाचा संदेश आपल्या गावी घेऊन जाण्याचा संकल्प केला.

On the occasion of Dhamma Chakra Pravartan Day, the message of safe travel reached every village.
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने देशभरातून आलेल्या नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने (आरटीओ) दिक्षाभूमी परिसरात एका विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दहा हजार नागरिकांनी या उपक्रमाला भेट देऊन सुरक्षित प्रवासाचा संदेश आपल्या गावी घेऊन जाण्याचा संकल्प केला.
या रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (ग्रामीण) विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अकोल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार व पूर्व नागपूरचे उप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नागपूर शहरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
रस्ता सुरक्षा गॅलरी ठरली आकर्षणाचा केंद्र
या जनजागृती अभियानासाठी एक विशेष 'रस्ता सुरक्षा गॅलरी' उभारण्यात आली होती. या गॅलरीमध्ये भित्तिपत्रके, रस्ता सुरक्षा बॅनर आणि प्रभावी स्लोगन्स (घोषवाक्ये) यांचे प्रदर्शन करण्यात आले होते. नागरिकांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शनपर पुस्तिका, रस्ता सुरक्षा पाठशाळा यांसारख्या उपयुक्त पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. याशिवाय हेल्मेट, सिटबेल्ट आणि सुरक्षित प्रवास या विषयांवरील माहितीपत्रकेही मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आली.
अपघात कमी करण्याची गरज
प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी आपल्या मनोगतात रस्ता अपघात कमी करण्यासाठी आणि अपघाती मृत्यूंची संख्या खाली आणण्यासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांची खूप आवश्यकता आहे, असे नमूद केले. रविंद्र भूयार यांनी दिक्षाभूमी येथे परिवहन विभागाकडून प्रथमच असा उपक्रम राबवण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
भोजनदानाची व्यवस्था
या अभियानाच्या ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांसाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नागपूर पूर्वचे सहा. प्रादेशिक परिहवन अधिकारी राहुल भागत, संतोष काटकर यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक साजन शेंडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक आकाश वालदे, कार्यालयीन अधिक्षक प्रशांत रामटेके, गजानन राठोड, अभिजीत उके, नितीन गणवीर यांनी विशेष परिश्रम घेतले.