आता लहान मुलांमध्येही दंत रोपण शक्य - शासकीय दंत महाविद्यालयाचा पुढाकार : ‘पेडोप्लांट’ नावाचा अभिनव उपाय सादर
By सुमेध वाघमार | Updated: April 22, 2024 15:47 IST2024-04-22T15:45:53+5:302024-04-22T15:47:58+5:30
लहान मुलांचे दात किडले किंवा अपघातामध्ये पडले तर भविष्यात दंतरोपण होणार शक्य

Children's Dental Health
नागपूर : लहान मुलांमधील पक्के दात अपघाताने पडल्यास किंवा किड लागल्याने दात काढण्याची वेळ आल्यास लहान मुलांसाठी दंत रोपणाची सोय नाही. याची दखल घेत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांच्या मार्गदर्शनात बाल दंतरोग विभागाचे प्रमुख डॉ. रितेश कळसकर आणि डॉ. शिवानी भादुले यांनी ‘पेडोप्लांट’ नावाचा अभिनव उपाय सादर केला आहे. यामुळे भविष्यात लहान मुलांमध्येही दंत रोपण शक्य होणार आहे.
लहान मुलांमध्ये जवळपास ६ महिन्यापर्यंत दुधाचे दात येतात. ६ ते ७ वर्षांपर्यंत दुधाचे दात पडायला लागतात. वयाच्या ११ ते १२ वर्षांपर्यंत पक्के दात येतात. हे दात खेळताना, अपघाताने पडू शकतात. किड, पीरियडॉन्टल समस्यांमुळे दात काढण्याची वेळ येऊ शकते. यावर कृत्रिम दात कँटिलिव्हर प्रणाली ने बसवता येतात. परंतु त्यांना मर्र्यादा पडतात. ‘रिमूव्हेबल डेंचर’ वापरण्याचा व त्यांना व्यवस्थित ठेवण्याचीही समस्या असते. शिवाय, प्लेसमेंटमध्ये अडचण आणि जबड्याच्या हाडांची झीज यासारखी आव्हाने असतात. याव्यतिरिक्त, काढता येण्याजोग्या दातांमुळे मुलांमध्ये मानसिक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, दंत रोपण हा मुलांसाठी एक व्यवहार्य उपचार पर्याय ठरू शकतो.
-वयस्कांचे दंत रोपण लहान मुलांमध्ये योग्य नाही
हाडांची उंची आणि घनता तसेच इम्प्लांटची लांबी आणि व्यास यासारख्या कारणांमुळे मोठ्यांचे दंत रोपण लहान मुलांसाठी योग्य ठरत नाही. या आव्हानांना तोंड देताना, बालरोग आणि प्रतिबंधक दंतचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. कळसकर व विभागातील माजी पदव्युत्तर विद्यार्थिनी डॉ. शिवानी भादुले यांनी ‘पेडोप्लांट’ नावाचा अभिनव उपचार सादर केला. हे दोन-भागांमध्ये बालदंत रोपण विशेषत: प्रौढ रोपणांशी संबंधित मयार्दांवर मात करण्यासाठी डिझाइन केले आहे.
-‘पेडोप्लांट’ला पारितोषिक
डॉ. कळसकर यांनी सांगितले, इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने आयोजित केलेल्या 'जेन झेड आयडिया जेनेसिस २०२४' या नावीन्यपूर्ण विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेमध्ये ‘पेडोप्लांट’ला सर्वाेच्च पारितोषिक मिळाले आहे.
-क्लिनीकल ट्रायलसाठी निधीची गरज
‘पेडोप्लांट’ची चाचणी संगणकावर घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. आता ‘क्लिनीकल ट्रायल’ची गरज आहे. त्यासाठी मोठा निधी लागतो. हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘आयसीएमआर’, ‘बायोटेक्नालॉजी’सारख्या मोठ्या संस्थांना प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
-डॉ. रितेश कळसकर, प्रमुख, बाल दंतरोग विभाग