'सर्वच गडगंज नसतात' भाजप महिन्याभराचे वेतन पूरग्रस्तांना देणार ! विजय वडेट्टीवारांच्या घोषणेवर भाजप प्रदेशाध्यक्षांचा टोला
By योगेश पांडे | Updated: September 25, 2025 18:26 IST2025-09-25T18:25:57+5:302025-09-25T18:26:57+5:30
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण : पूरपरिस्थितीवर कुणीही राजकारण करू नये

'Not everyone is a Rich' BJP will give a month's salary to flood victims! BJP state president hits out at Vijay Vadettiwar's announcement
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या विविध भागात पूर व अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपचे सर्व आमदार व खासदार महिन्याभराचे वेतन मदतनिधीत देणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. नागपुरात ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात पूर परिस्थिती विदारक आहे. महायुती सरकारने सर्व भागांमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईसंदर्भात पाहणी करून नागरिकांना आवश्यक ती मदत करण्याचे ठरविले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
सरकार मायबाप म्हणून पूर्णतः शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी सहा महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांना देण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत त्यांचे अभिनंदन आहे. मात्र सर्वच लोकप्रतिनिधी गडगंज नसतात. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना मिळणारे वेतन प्रवास भत्यासाठी मिळत असते. कुणाचीही काहीही भावना असली तरी पूरपरिस्थितीत राजकारण करणे योग्य नाही असे म्हणत त्यांनी वडेट्टीवार यांना टोला लगावला.
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी आवश्यक त्या ठिकाणी जाऊन मदत करत आहे. मात्र मदत करण्याची भावना सर्वांची असली पाहिजे, असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला.