'आरक्षणाबाबत कुणी अकलेचे तारे तोडू नये' सुप्रिया सुळेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रा. कवाडेंनी फटकारले
By आनंद डेकाटे | Updated: September 26, 2025 19:49 IST2025-09-26T19:48:16+5:302025-09-26T19:49:00+5:30
प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी खा. सुप्रिया सुळे यांना फटकारले : पीरिपाचे बुधवारी राष्ट्रीय अधिवेशन

'No one should break the rules regarding reservation' Prof. Kawade reprimanded after Supriya Sule's 'controversial' statement
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरक्षण हे काही गरीबी हटाव कार्यक्रम नाही, तर त्याचा उद्देश समता प्रस्तापित करण्यासाठी आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत कुणी अकलेचे तारे तोडू नये, अशा शब्दात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांना फटकारले. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खा. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी आरक्षण हे आर्थिक निकषावर असावे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शुक्रवारी प्रा.जाेगेंद्र कवाडे यांनी सुद्धा या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, अलीकडे आरक्षणाबाबत उलटसुलट वक्तव्य केले जात आहेत. आरक्षणाबाबतचे धोरण ठरलेले असताना असे वक्तव्य योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा)चे राष्ट्रीय अधिवेशन व भीमसैनिकांचा मेळावा येत्या बुधवारी १ ऑक्टोबर रोजी नागपुरातील आयटीआय मैदान दीक्षाभूमी रोड येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, रिपब्लिकन नेते नानासाहेब इंदिसे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या मार्गदर्शनात पक्षाच्या उच्चाधिकार समितीची बैठक हाईल. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मागासवर्गीयांचे आरक्षण, खासगी विद्यापीठे व उद्योग क्षेत्रात आरक्षण, पीडित शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी व महागाई या विषयावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल,अशी माहितीही प्रा. कवाडे यांनी यावेळी दिली. पत्रपरिषदेला कैलास बोंबले, विजय पाटील, दिलीप पाटील, भीमराव कळमकर आदी उपस्थित होते.
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी १४ ला मुंबईत मोर्चा
बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत बैठक बोलावली होती. त्यात समाजातील सर्वच पक्षाचे नेते सहभागी झाले होते. त्या बैठकीत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्यावतीने येत्या १४ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही कवाडे यांनी दिली.