मोबाइल लोकेशनच्या आधारे घेणार निरालांच्या मृतदेहाचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 11:28 IST2023-07-31T10:43:10+5:302023-07-31T11:28:57+5:30

सहाही आरोपींची कसून तपासणी : अमरावती मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त

Niral's dead body will be searched based on mobile location | मोबाइल लोकेशनच्या आधारे घेणार निरालांच्या मृतदेहाचा शोध

मोबाइल लोकेशनच्या आधारे घेणार निरालांच्या मृतदेहाचा शोध

नागपूर : कापडाचे व्यापारी निरालाकुमार जयप्रकाश सिंग यांचा मृतदेह पाच दिवसानंतर ही आढळून न आल्यामुळे कोंढाळी पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत असून त्यांच्या मोबाइलच्या अखेरच्या लोकेशनवरून मृतदेहाचा शोध घेण्यात येणार आहे. त्या आधारावरच पोलिस तपासाची दिशा ठरविणार आहेत.

नागपुरातील व्यावसायिक अंबरीश गोळे व निरालाकुमार यांच्या दुहेरी हत्याकांडात अटक असलेला सूत्रधार ओंकार महेंद्र तलमले (वय २५, रा. स्मृती लेआऊट), लकी संजय तुर्केल (वय २२ रा. मरियमनगर), हर्ष आनंदलाल वर्मा (वय २२, रा. वाडी), दानिश दुर्गाप्रसाद शिवपेठ (वय २१, रा. गोधनी), हर्ष सौदागर बागडे (वय १९, रा. दत्तवाडी) व बजरंग दलाचा संयोजक विशाल पुंज यांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. नदीत निराला यांचा मृतदेह फेकल्याचे तलमले सांगत आहे. मात्र अद्यापही पोलिसांना मृतदेह आढळून आलेला नाही.

पोलिसांनी अमरावती मार्गावरील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. चार वाजताच्या सुमारास दोन वाहनांनी आरोपी हे नागपुरात परत येत असल्याचे यावरून दिसत आहे. नागपुरात आल्यानंतर सर्वजण कोठे गेले. तलमले याने कोणत्या मार्गाने मृत अंबरीशची कार नेऊन एमआयडीसीतील कंपनीत ठेवली, याचा पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Niral's dead body will be searched based on mobile location