नागपुरात १३ दिवसांत नऊ हत्या, दारूच्या नशेत मेहुण्याकडून जावयाचा खून
By योगेश पांडे | Updated: April 16, 2025 23:49 IST2025-04-16T23:49:38+5:302025-04-16T23:49:38+5:30
पोलिसांनी आरोपी व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले

नागपुरात १३ दिवसांत नऊ हत्या, दारूच्या नशेत मेहुण्याकडून जावयाचा खून
नागपूर : नागपुरात हत्यांचे सत्र सुरूच असून बुधवारी रात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीला त्याच्या मेहुण्यानेच ठार मारले. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर ही हत्या झाली. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मागील १३ दिवसांतील ही नववी हत्येची घटना ठरली आहे.
ताराचंद प्रजापती(३५, कळमना) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर राहुल इंगळे व यश ओगले हे आरोपी आहेत. आरोपी व मृतक हे मजुरीची कामे करत होते.ताराचंद व त्याच्या बायकोत वाद सुरू होते. राहुलमुळेच वाद झाल्याचा ताराचंदचा गैरसमज झाला होता. बुधवारी रात्री तिघेही मेहंदीबाग पुलाखाली एकत्रित आले व दारू प्यायले. त्यानंतर दारूच्या नशेत ताराचंदने मुद्दा उकरून काढला व त्यातून वाद झाला. ताराचंदने शिवीगाळ सुरू केली व संतापलेल्या राहुलने यशच्या मदतीने त्याला मारहाण केली. तेथेच पडलेल्या सिमेंटच्या दगडाने आरोपींनी ताराचंदच्या डोक्यावर वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. परिसरातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ताराचंदला मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरदेखील दोन्ही आरोपी दारूच्याच नशेत होते.