पुढील महामारी आल्यास १५० दिवसांत नवी लस; पुढील पाच वर्षांत कॅन्सरवर लस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:15 IST2026-02-18T15:14:58+5:302026-02-18T15:15:43+5:30
Nagpur : कोरोना काळात भारताने स्वतःची प्रतिबंधक लस विकसित करून सुमारे ४० लाख लोकांचे जीव वाचवले. त्या अनुभवाच्या बळावर पुढील कोणतीही महामारी उद्भवल्यास भारत १५० दिवसांत नवी लस विकसित करून ती देशभर उपलब्ध करू शकतो.

New vaccine in 150 days if the next pandemic occurs; Cancer vaccine in the next five years?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना काळात भारताने स्वतःची प्रतिबंधक लस विकसित करून सुमारे ४० लाख लोकांचे जीव वाचवले. त्या अनुभवाच्या बळावर पुढील कोणतीही महामारी उद्भवल्यास भारत १५० दिवसांत नवी लस विकसित करून ती देशभर उपलब्ध करू शकतो, असा ठाम विश्वास ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि कोविड व्हॅक्सीन टास्क फोर्सचे माजी सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) वतीने सोमवार 'रिसर्च डे' आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. अरोरा मुख्य वक्ता म्हणून उपस्थित असताना ते 'लोकमत'शी बोलत होते. 'एम्स' बिलासपुरचे अध्यक्ष असून 'इन्क्लेन ट्रस्ट इंटरनॅशनल'चे अध्यक्ष डॉ. अरोरा म्हणाले की, कोविड-१९ काळातील अनुभवामुळे भारताची महामारी प्रतिसाद क्षमता मूलभूत पातळीवर बदलली आहे. नॅशनल टेक्निकल एडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे सदस्य असल्याने कोविड काळात व्हॅक्सीन धोरणावरही मार्गदर्शन केले.
भारत आता शून्यातून सुरुवात करत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, देशाकडे विविध अत्याधुनिक लस प्लॅटफॉर्म तयार अवस्थेत आहेत. यामध्ये 'एमआरएनए', 'डीएनए', 'व्हायरल व्हेक्टर', 'इनॅक्टिव्हेटेड व्हायरस', 'लाइव्ह अटेन्युएटेड', 'प्रोटीन सबयुनिट' आणि 'व्हायरस-लाइक पार्टिकल' प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे.
भारत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक
कोविड काळात भारताने एकही लस आयात केली नाही, ही आत्मनिर्भरतेची मोठी कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले. आज भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश असून, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत कमी किमतीत मोठ्या प्रमाणात लसी पुरवतो.
संशोधन म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा
डॉ. अरोरा यांनी जैववैद्यकीय संशोधनाला केवळ आरोग्याचा विषय न मानता राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्याशी जोडले. महामारी एका रात्रीत अर्थव्यवस्था कोलमडवू शकते. संशोधन क्षमता ही संरक्षण सज्जतेइतकीच महत्त्वाची आहे, असा इशारा त्यांनी दिला.
पुढील पाच वर्षांत कॅन्सरवर लस?
सध्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण देणारी 'एचपीव्ही' लस उपलब्ध असून, ती आता भारतात तयार होत आहे. त्यामुळे तिची किंमतही कमी झाली आहे. याशिवाय देशात विविध प्रकारच्या कॅन्सरवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. पुढील पाच वर्षात कॅन्सरविरोधी लस उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त करत डॉ. अरोरा म्हणाले, हे यश मिळाले तर लाखो जीव वाचू शकतात.