सेवाभावाने स्थापन झालेली ‘एनसीआय’ हजारो दु:खांचे निवारण करेल : अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:25 IST2025-05-27T11:25:09+5:302025-05-27T11:25:27+5:30

‘स्वस्ती निवास’चे भूमिपूजन

NCI established with a spirit of service will alleviate thousands of sufferings Amit Shah | सेवाभावाने स्थापन झालेली ‘एनसीआय’ हजारो दु:खांचे निवारण करेल : अमित शाह

सेवाभावाने स्थापन झालेली ‘एनसीआय’ हजारो दु:खांचे निवारण करेल : अमित शाह

नागपूर :  नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना सेवाभावाने झाली. समाजात कोणी दु:खी राहू नये, या विचाराने झाली. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत ही संस्था देशातील सर्वाेत्तम कॅन्सर इन्स्टिट्यूट राहील, असा विश्वास आहे. त्यातील ‘स्वस्ती निवास’ हे कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी येथे व्यक्त केले. 

शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जामठा परिसरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या (एनसीआय) स्वस्ती निवास या इमारतीचे भूमिपूजन, तसेच कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.  व्यासपीठावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, पर्नाे रिका इंडिया कंपनीचे सीईओ जॉ तुबूल, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक उपस्थित होते.  

राज्यातील पहिल्या ‘एनएफएसयू’चे भूमिपूजन 

राज्यातील पहिल्या ‘एनएफएसयू’च्या (नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी) कायमस्वरूपी कॅम्पसचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी तात्पुरत्या कॅम्पसचेदेखील ई-अनावरणही झाले. कामठी तालुक्यात चिचोली येथे हा कार्यक्रम झाला. 

‘एनएफएसयू’हे जगातील पहिले आणि एकमेव फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ आहे. नागपुरात ‘एनएफएसयू’चे अकरावे कॅम्पस राहणार आहे. गुजरात, नवी दिल्ली, गोवा, त्रिपुरा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, मणिपूर, पुणे आणि परदेशात युगांडा येथे विद्यापीठ कार्यरत आहे.

‘एनसीआय’ला रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून साकारू’  

अमित शाह यांनी ‘एनसीआय’ ही संस्था देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. येत्या काळात हे ध्येय आम्ही नक्कीच साकारू.  नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा रुग्ण आणि कुटुंबीयांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.   

पाच अभ्यासक्रम : एनएफएसयूमध्ये २०२५-२६ पासून फॉरेन्सिक व सायबर सुरक्षेशी संबंधित पाच अभ्यासक्रम सुरू होतील. त्यात एमएसस्सी (फॉरेन्सिक), एमएसस्सी (सायबर सिक्युरिटी), बीबीए, एमबीए या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

Web Title: NCI established with a spirit of service will alleviate thousands of sufferings Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.