राष्ट्रीय कॅन्सर ग्रीड योजनेला राज्यात प्राधान्य

By Admin | Updated: August 21, 2016 03:19 IST2016-08-21T03:19:18+5:302016-08-21T03:19:18+5:30

राज्याच्या कानाकोपऱ्यात कर्करोगावरील उपचार पोहोचला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

National Cancer Grid Scheme Preferences in State | राष्ट्रीय कॅन्सर ग्रीड योजनेला राज्यात प्राधान्य

राष्ट्रीय कॅन्सर ग्रीड योजनेला राज्यात प्राधान्य

मुख्यमंत्री फडणवीस : ‘नॅशनल काँग्रेस आॅन मॅनेजमेंट आॅफ थायरॉईड कॅन्सर’वर परिषद
नागपूर : राज्याच्या कानाकोपऱ्यात कर्करोगावरील उपचार पोहोचला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘नॅशनल कॅन्सर ग्रीड’ला महाराष्ट्रातही प्राधान्य दिले जाईल. यामुळे उपचारात सुसूत्रता व एकवाक्यता येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
‘नॅशनल काँग्रेस आॅन मॅनेजमेंट आॅफ थायरॉईड कॅन्सर’च्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. थायरॉईड सोसायटी नागपूर आणि विदर्भ व सोसायटी आॅफ हेड अँड नेक आॅन्कॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, आयोजन समिती अध्यक्ष डॉ. मदन कापरे, सचिव डॉ. देवेन माहोरे, डॉ.प्रथमेश पै व डॉ. आर. रवी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण दिसून येतात. यातील बरेचसे रुग्ण शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी येतात, अशावेळी या रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांनाही कठीण जाते. म्हणूनच कॅन्सरचे लवकर निदान होण्यासाठी जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे. ही परिषद यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास आहे. थायरॉईड कॅन्सर विशेषज्ञ डॉक्टरांनी मिळून स्थापन केलेल्या या संस्थेमुळे सामान्य माणसाला तात्काळ आरोग्य सेवा मिळणे सोईचे होईल. कॅन्सर विरोधी लढा देण्यासाठी थायरॉईड सोसायटी मोठ्या प्रमाणात जागृती करेल, असेही ते म्हणाले. तंबाखूच्या दुष्परिणामांची जनजागृती शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे गेल्या अनेक वर्षांपासून करीत असल्याचे सांगून, त्यांच्या कार्याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केले.
खा. अजय संचेती म्हणाले, राज्यातच नव्हे तर देशात मधुमेहासोबतच थायरॉयडचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. या धर्तीवर ‘इंडियन सोसायटी आॅफ थायरॉयड सर्जन्स’ या संस्थेची केलेली स्थापना रुग्णांच्या फायद्याची ठरणार आहे. गेल्या २१ वर्षांपासून डॉ. कापरे मेळघाटात आपली सेवा देत आहे. त्यांचे हे कार्य मोलाचे असल्याचेही ते म्हणाले. डॉ. मदन कापरे यांनी संस्थेचे उद्दिष्ट मांडले. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थायरॉईड सोसायटीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. डॉ. तुलसीदास भिलावेकर यांचा उत्कृष्ट सेवेसाठी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक डॉ. माहोरे यांनी केले. आभार डॉ. आर. रवी यांनी मानले. कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. विनय हजारे, डॉ. पिनाक दंदे, डॉ. राजू खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: National Cancer Grid Scheme Preferences in State