पुनर्विकासाचे मॉडेल ठरणार नागपूरचे स्मार्ट रेल्वे स्टेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:35 IST2025-07-16T15:32:16+5:302025-07-16T15:35:05+5:30
अमृत भारत स्टेशन योजना : आधुनिक सोयी-सुविधांवर भर

Nagpur's smart railway station will be a model for redevelopment
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या पुनर्विकासाच्या कामांमुळे नागपूरचेरेल्वे स्थानक 'मॉडेल' ठरणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातीलच नव्हे तर देशातील एक प्रमुख रेल्वे स्थानक म्हणून नागपूर स्थानकाचे महत्त्व आहे. या स्थानकावरून देशाच्या चारही दिशांना गाड्या जातात आणि येतात. त्यामुळे येथे वर्षातील ३६५ दिवस प्रवाशांची २४ तास वर्दळ असते. या स्थानकाचे पुनर्विकासाचे काम धडाक्यात सुरू आहे. येथे प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
लाइन नंबर १८ आणि १९ दरम्यान उभारण्यात येणाऱ्या एलिवेटेड कंकोर्सच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची वाहतूक अधिक सुलभ आणि स्वतंत्र होणार आहे. जुन्या इमारती पाडून त्या बदल्यात पूर्व आणि पश्चिम दिशेला नवीन स्टेशन इमारतींचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीचे जतन तसेच संवर्धन करण्यावर कटाक्षाने भर दिला जात आहे. त्यानुसार, इमारतीचे बाह्य भाग स्वच्छ करून, वॉटरप्रूफिंग, अंतर्गत सजावट तसेच स्थापत्य लायटिंगवर विशेष लक्ष देऊन या इमारतीचा वारसा जपला जात आहे.
बाह्यसौंदर्याकडेही लक्ष
इमारतीच्या आतल्या भागासोबतच बाहेरच्या भागाचे सौंदर्य खुलविण्यावरही विशेष लक्ष दिले जात आहे. कलात्मक भित्तीचित्रे, डिजिटल साइन बोर्डस् तसेच कलाकुसरीतून बाह्य भाग देखणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
...पण नेमके कधी होणार पूर्ण ?
सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर नागपूरचे हे रेल्वे स्थानक सर्व प्रवाशांसाठी जगातल्या सर्वोत्कृष्ट सुविधा आणि सुलभ वाहतूक प्रदान करणारे एक मॉडेल स्थानक म्हणून ओळखले जाईल, असा दावा रेल्वे प्रशासन दर दोन-तीन महिन्यांतून प्रसिद्धीपत्रकातून करीत असते. मात्र, हे काम नेमके कधी पूर्ण होणार, नियोजित मुदतीनुसार कामाची प्रगती आहे की नाही, त्याची मात्र स्पष्ट माहिती दिली जात नाही.