'यूपीएससी'त नागपूरचे 'आठ तारे' चमकले ! ऋतुजा गायकवाडला मिळाली देशातून १०६ वी रँक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 13:14 IST2026-03-07T13:12:26+5:302026-03-07T13:14:11+5:30
Nagpur : स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यश दूर राहत नाही, हे नागपूर येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा सिद्ध केले.

Nagpur's 'eight stars' shine in UPSC! Rituja Gaikwad gets 106th rank in the country
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यश दूर राहत नाही, हे नागपूर येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा सिद्ध केले. यूपीएससीच्या प्रतिष्ठित नागरी सेवा परीक्षेत या केंद्रावरील आठ उमेदवारांनी यशस्वी रैंक मिळवत प्रशासकीय सेवेकडे दमदार पाऊल टाकले. ऋतुजा गायकवाड हिने देशात १०६ वी रैंक पटकावत यशाला नवी उंची दिली आहे.
नागपूरच्या केंद्रातील ऋतुजा गायकवाड १०६ रैंक, रजत वाळके ५१४ वी रैंक, भाग्यश्री नैकाले ६४७रैंक, प्रज्वल नासरे ६७७ रैंक, चेतन ठाकरे ६६२ रैंक, राजश्री देशमुख ७५४ रैंक, प्रांजली मेश्राम ७६७ रैंक, हेमकृष्ण पिसाडे ८४९ रैंक, सुरेश बोरकर ९१२ रैंक या उमेदवारांनी बाजी मारत यशाचा मार्ग प्रशस्त केला आहे. यातील ऋतुजा गायकवाड यांनी देशभरातून १०६ वी रैंक प्राप्त करीत आयएएस होण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
विशेष म्हणजे भाग्यश्री नैकेले आणि सुरेश बोरकर मागील वर्षीही यशस्वी झाले होते. सध्या ते प्रशासकीय सेवेत असून त्यांनी पुन्हा एकदा श्रेणीसुधारसाठी यूपीएससी दिली होती. तर राजश्री देशमुख या पश्चिम महाराष्ट्रात नगर जिल्ह्याच्या संगमनेर येथील आहेत. मागील वर्षी प्रशिक्षण केंद्रातील बारा उमेदवार उत्तीर्ण झाले होते. यावर्षीच्या निकालात काहीशी घट दिसत असली तरी प्रचंड काठिण्य पातळी असल्याने निकालात नागपूरकरांना मिळालेले यश उल्लेखनीय मानले जात आहे. प्रशासकीय सेवेसाठी देशातील या सर्वात कठीण व महत्त्वपूर्ण परीक्षेचे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे पार करावे लागतात. यंदाची पूर्वपरीक्षा २५ मे २०२५ रोजी झाली.
महाराष्ट्राचे ५० हून अधिक उमेदवार यशस्वी
एकूण ९५८ उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यातील ५०हून अधिक उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. पहिल्या शंभर जणांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. त्यातील ऋषीकेश आलासे यांनी देशात ६१वा क्रमांक, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आकाश त्रिवेदी यांनी ७३, गौरव चोप्रा यांनी ८३, सायली पगार यांनी ८७ वा, तर दीक्षा पाटकर यांनी ८८ वा क्रमांक पटकावला आहे. आयोगाने ३४८ जणांची उमेदवारी प्रोव्हिजनल ठेवली आहे.
राजेश्वरी सुवे एम. दुसरी तर धुल तिसरा
राजेश्वरी सुवे एम. आणि आकांश धुल यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. राघव झुनझुनवालाने चौथा, तर ईशान भटनागरने पाचवा क्रमांक मिळवला. अग्निहोत्रीने एम्स, जोधपूर येथून एमबीबीएस पदवी घेतली आहे. मुख्य परीक्षा २२ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान झाली. एकूण २,७३६ उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडण्यात आले. देशभरातून ४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मुलाखत प्रक्रिया ५ जानेवारी ते २७फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडली.
एम्स पदवीधर अनुज अग्निहोत्री देशात अव्वल
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर केला असून, या परीक्षेत एमबीबीएस पदवीधर अनुज अग्निहोत्री याने देशात अव्वल क्रमांक मिळवला. मेडिकल सायन्स हा त्याचा ऐच्छिक विषय होता.
"यूपीएससीमध्ये प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. यावर्षी ११७ विद्यार्थ्यांनी मुलाखत पूर्वतयारी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यातील ९० च्या वर उत्तीर्ण झाले आहेत."
-डॉ. प्रमोद लाखे, मुख्य संयोजक, महाराष्ट्र मुलाखत पूर्वतयारी कार्यक्रम.