नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रिकार्डमध्ये नोंद
By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 2, 2025 18:17 IST2025-09-02T18:15:44+5:302025-09-02T18:17:51+5:30
नागपूर-कामठी मेट्रो मार्ग : जागतिक दर्जाच्या या पुरस्कारामुळे नागपूरची जगातील उत्कृष्ट पायाभूत शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

Nagpur's double-decker flyover enters Guinness Book of World Records
नागपूर : महामेट्रोने कामठी मार्गावरील सर्वात लांब डबल डेकर पुलाची निर्मिती केली असून या पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झाली आहे. जागतिक दर्जाच्या या पुरस्कारामुळे नागपूरची जगातील उत्कृष्ट पायाभूत शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
या जागतिक पुरस्काराबद्दल मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत गिनिज वर्ल्ड रेकार्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्निल डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना गिनिज वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.
५.६३७ कि.मी. लांबीचा पूल सिंगल कॉलम पिल्लरवर उभा
कामठी मार्गावरील डबल डेकर हा जगातील डबल डेकर व्हायाडक्ट आहे. मेट्रो व हायवे वाहतुकीसाठी ५.६३७ कि.मी. लांबीचा सिंगल कॉलम पिल्लरवर उभा असून हा स्थापत्य कलेचे अद्भूत उदाहरण आहे. या पुलासाठी १ हजार ६५० टन स्टिलचा वापर करण्यात आला. यापूर्वी छत्रपतीनगर येथील ३.२ कि.मी. लांबीच्या डबल डक्ट उड्डाणपुलाची निर्मितीसाठी जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली होती, हे विशेष.
श्रावण हर्डीकर म्हणाले, अशा प्रकारच्या डबल डेकर पुलांची निर्मिती करणारे महामेट्रो व नागपूर हे पायोनिअर आहे. यावेळी पुलाच्या निर्मितीसंदर्भातील चित्रफित दाखविण्यात आली. उड्डाणपुलावर गड्डीगोदाम, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड, ऑटोमोटीव्ह चौक ही पाच मेट्रो स्थानके बांधण्यात आली आहे. हा उड्डाणपुल चार पदरी असून पहिल्या स्तरावर महामार्ग, दुसऱ्या स्तरावर मेट्रो आणि जमीन स्तरावर आधीच असलेला महामार्ग आहे. या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
याप्रसंगी महामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे, प्रकल्प संचालक राजीव त्यागी, कार्यकारी संचालक नरेश गुरबानी, एनएचएआयचे प्रादेशिक अधिकारी राकेश सिंग, प्रकल्प संचालक सी. एम. सिन्हा आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डचे प्रतिनिधी उपस्थित होते.