औरंगजेबच्या कबरीवरुन नागपूरात दगडफेक अन् जाळपोळ; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 22:18 IST2025-03-17T22:17:33+5:302025-03-17T22:18:21+5:30

Devendra Fadnavis on Nagpur Violence: गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nagpur Violence: Stone pelting and arson over Aurangzeb's tomb in Nagpur; Chief Minister appeals for peace | औरंगजेबच्या कबरीवरुन नागपूरात दगडफेक अन् जाळपोळ; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

औरंगजेबच्या कबरीवरुन नागपूरात दगडफेक अन् जाळपोळ; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

Nagpur Violence: गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मागणीसाठी राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सोमवारी दोन गटात हिंसक हाणामारी झाली आहे. सायंकाळी नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरुन हे दोन्ही गट समोरासमोर आले. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. या घटनेत अनेक पोलिसही जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शांततेचे आवाहन केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?
नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, नागपूर हे शांतताप्रिय आणि सहकार्यशील शहर आहे. ही नागपूरची परंपरा आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नितीन गडकरींनी केले शांततेचे आवाहन
काही अफवांमुळे नागपुरात धार्मिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराचा इतिहास अशा बाबींमध्ये शांतता राखण्यासाठी ओळखला जातो. मी माझ्या सर्व बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखण्याचे आवाहन करतो. रस्त्यावर येऊ नका, कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेला सहकार्य करा. नागपूर ज्या शांतता आणि सौहार्दाची परंपरा म्हणून ओळखले जाते, ती जपा. मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो की ज्यांनी चुका केल्या आहेत किंवा बेकायदेशीर कृत्ये केली आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई करेल. मुख्यमंत्र्यांना या परिस्थितीची आधीच माहिती देण्यात आली आहे, म्हणून मी सर्वांना विनंती करतो की, अफवांकडे लक्ष देऊ नका. कृपया पोलिस प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अचानक सुरू झाली दगडफेक
औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी, या मागणीसाठी नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगजेबाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच पोस्टर फाडण्यात आले. यामुळे महाल परिसरात दिवसभर तणावाची स्थिती होती व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. सायंकाळी दोन गटांत तणाव निर्माण झाला आणि अचानक दगडफेक आणि जाळपोळ झाली. 

दगड, चाकू फेकून मारत होते...

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच आग विझवण्यासाठी दाखल झालेले अग्निशामक दलाचे जवान यांच्यावरही जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलक दगड, चाकू फेकून मारत आहेत, अशी प्रतिक्रिया आग विझवायला गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. या घटनेत अनेक पोलिस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले आहेत. शिवाय, परिसरातील वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. 

Web Title: Nagpur Violence: Stone pelting and arson over Aurangzeb's tomb in Nagpur; Chief Minister appeals for peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.