नागपूर विद्यापीठाचा नवा अजेंडा , रोजगार, संशोधन आणि जागतिक रँकिंगमध्ये सुधारणा
By आनंद डेकाटे | Updated: December 3, 2025 17:14 IST2025-12-03T17:11:24+5:302025-12-03T17:14:26+5:30
Nagpur : डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांनी स्वीकारला कुलगुरू पदाचा कार्यभार

Nagpur University's new agenda, employment, research and improvement in global rankings
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांनी बुधवारी पदभार स्वीकारताच स्पष्ट केले की येणाऱ्या वर्षांत विद्यापीठाचा मुख्य अजेंडा रोजगाराभिमुख शिक्षण, उत्कृष्ट संशोधन आणि जागतिक रँकिंगमध्ये सुधारणा हा असेल. पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यापीठाच्या शिक्षण मॉडेलमध्ये व्यापक सकारात्मक बदल होणार असल्याचे संकेत दिले.
डॉ. क्षीरसागर यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी कुलसचिव डॉ. राजू हिवसे, सर्व शाखांचे डीन, विविध प्राधिकरणांचे सदस्य, विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक प्रांगणातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की नागपूरमध्ये उद्योगांचे जलदगतीने विस्तार होत आहे; पण कुशल मानवसंसाधनांच्या कमतरतेमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अपेक्षित रोजगार मिळत नाही. या आव्हानाला संधीमध्ये बदलण्यासाठी विद्यापीठ काळाच्या गरजेनुसार उद्योगांवर आधारित आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित नवे कोर्स सुरू करणार आहे, ज्यामुळे उद्योगांना आवश्यक ते मानवसंसाधन उपलब्ध होईल. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवणे सोपे होईल,असे त्यांनी सांगितले. नागपूर विद्यापीठातील प्र-कुलगुरू आणि विविध शाखांचे अधिष्ठातां यांची नियमित नियुक्तीही लवकरच होईल,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
परीक्षा तीन शिफ्टमध्ये
आधीच विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या आयोजनात मोठा विलंब होत आहे. डॉ. क्षीरसागर यांनी या समस्येवर उपाय सांगताना विश्वास व्यक्त केला की हिवाळी परीक्षा तीन शिफ्टमध्ये घेण्यात येतील आणि निकाल वेळेवर घोषित करण्यासाठी आवश्यक समीक्षा केली जाईल. परीक्षेचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल. तसेच हिवाळी परीक्षा नियमित वेळेतच घेतल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
क्यूएस रँकिंगसाठी अर्ज
कुलगुरू म्हणाल्या की विद्यापीठाची प्रशासकीय व्यवस्था समजून घेतल्यानंतर आवश्यक ते सुधार केले जातील आणि संलग्न महाविद्यालयातही अशाच प्रकारे सुधारणा राबविल्या जातील. एलआयआरएफ रँकिंगमध्ये सुधारणा करून विद्यापीठ क्यूएस) रँकिंगसाठीही अर्ज करणार आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्कृष्ट संशोधनावर विशेष भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणार
नागपूर विद्यापीठातील घटती विदेशी विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांनी चिंता व्यक्त केली आणि सांगितले की जागतिक स्तरावर कुशल मानवसंसाधनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे विद्यापीठ आपले कोर्स आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करेल, जेणेकरून विदेशी विद्यार्थी नागपूर विद्यापीठाला प्राधान्य देतील.
माजी विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी जोडणार
कुलगुरू डाॅ. क्षीरसागर यांनी सांगितले की विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणारे माजी विद्यार्थी हे विद्यापीठाची मोठी ताकद आहेत. त्यांचे अनुभव, मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे विद्यापीठाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते. माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येतील, असा त्यांनी विश्वास दिला.