नागपूर ते चंद्रपूर २३५३ कोटींचा महामार्गाला मंजुरी ! रस्त्याच्या परिसरात विकासाची 'इकोसिस्टीम' तयार केली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:00 IST2025-10-03T13:57:35+5:302025-10-03T14:00:51+5:30
२०४ कि.मी. महामार्ग प्रकल्पाला मान्यता : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत विकासाला वेग!

Nagpur to Chandrapur highway worth Rs 2353 crore approved! 'Ecosystem' of development to be created in the area of the road
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर ते चंद्रपूर या २०४ किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यामध्ये कुठलाही रस्ता बांधताना रस्त्याच्या परिसरात विकासाची 'इकोसिस्टीम' (परिसंस्था) निर्माण करण्यात यावी. त्यासाठी आधीपासूनच भूसंपादन करून नियोजन करण्याचे निर्देशही दिले. नागपूर ते चंद्रपूर महामार्ग नवेगाव मोरेपर्यंत करण्यात येत असल्याने पुढे सुरजागड लोह प्रकल्पापर्यंत या महामार्गाची लांबी वाढवण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते. राज्यामध्ये यापुढे पायाभूत सुविधांची कामे घेताना ती आधी गतिशक्ती पोर्टलवर आणावी. गतिशक्ती पोर्टलवर घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करू नये. यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याचे निर्देश दिले.
बैठकीस अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय, प्रधान सचिव (विधी व न्याय) सुवर्णा केवले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
पूर्व विदर्भातील पायाभूत रस्ते प्रकल्पांविषयी
- नागपूर ते चंद्रपूर चार पदरी सिमेंट काँक्रिटीकरण महामार्ग, लांबी २०४ किलोमीटर, चंद्रपूर शहराला जोड रस्ता ११ किलोमीटर, भूसंपादनासह एकूण खर्च २३५३.३९ कोटी.
- नागपूर ते गोंदिया १६२ किलोमीटर लांबीचा चार पदरी द्रुतगती महामार्ग, भूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू. अंदाजित किंमत १८,५३९ कोटी.
- भंडारा ते गडचिरोली चार पदरी द्रुतगती महामार्ग, लांबी २४ किलोमीटर, अंदाजित एक रक्कम दहा हजार २९८ कोटी. भूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू.