In Nagpur, Tipper killed two sisters | नागपुरात टिप्परने दोन सख्ख्या बहिणींना चिरडले
नागपुरात टिप्परने दोन सख्ख्या बहिणींना चिरडले

ठळक मुद्देभंडारा मार्गावरील पारडीतील घटना : परिसरात तणाव पोलीस-मेट्रोविरुद्ध तीव्र संताप,  नागरिकांनी घातला गोंधळ 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ‍ॅक्टिव्हाने दूध आणायला जात असलेल्या दोन तरुण बहिणींना टिप्परने चिरडले. या दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी पारडी चौक हनुमान मंदिराजवळ घडली. 


लक्ष्मी रमाशंकर शाहू (२१) व आँचल रमाशंकर शाहू (१९) रा. प्लॉट नं. १९६ जयदुर्गा शंकर किराणाजवळ बीडगाव, अशी मृत बहिणींची नावे आहेत.  मृत बहिणींचे वडील रमाशंकर शाहू यांचे घरीच किराणा दुकान आहे. दोन्ही बहिणी आईवडिलांना कामात मदत करायच्या. आचल महाविद्यालयात पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती तर लक्ष्मी हिने अकरावीनंतरच शिक्षण सोडले होते. साहू यांची मोठी मुलगी ज्योती हिचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. सर्वात लहान मुलगी चंचल अकरावीची विद्यार्थिनी आहे. शाहू आपल्या किराणा दुकानात दूध विक्रीही करतात. दुकानासाठी लागणारे दूध सर्वात लहान मुलगी चंचल ही नेहमीच भवानीनगर येथील एका दुकानातून आणायची कधी-कधी आचल व लक्ष्मीसुद्धा दूध आणायला जात असत. बुधवारी सुद्धा दोघीही दूध आणायला भवानी नगरला गेल्या होत्या. 
 सकाळी ७.१५ वाजता दोन्ही बहिणी दूध घेऊन अ‍ॅक्टीव्हाने घराकडे परत जात होत्या. आचल गाडी चालवित होती. दोघी पारडी बाजार चौक ओलांडून भांडेवाडी मार्गाकडे जात होत्या. त्याच वेळी भंडारा रोडच्या दिशेकडून वाळूने भरलेला टिप्पर (क्र. एम.एच./४०/ए.के.१००८) भरधाव वेगाने आला. त्याने अ‍ॅक्टीव्हाला धडक दिली. त्यावेळी पारडी चौकात चांगलीच वर्दळ होती. धडकेचा आवाज ऐकून लोकांनी टिप्पर चालकास गाडी रोखण्यासाठी आवाज दिला. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. टिप्पर चालकाने अ‍ॅक्टीव्हास्वार बहिणींना तब्बल ८० फूटापर्यंत चिरडत नेले. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक जाम केली. वाहतूक पोलीस आणि मेट्रो रेल्वेचे संथगतीने सुरू असलेल्या कामामुळेच हा अपघात झाल्याचे लोकांचे म्हणणे होते. मेट्रोच्या कामामुळे येथील वाहतूक प्रभावित होते. ऑटोचालक रस्त्यावर ठाण मांडून असतात. वाहतूक पोलीस रस्त्याच्या बाजूला उभे असतात. परंतु कुठलीही कारवाई करीत नाही. 
मेट्रो प्रशासन व वाहतूक पोलिसांना अनेकदा याची तक्रार सुद्धा करण्यात आली. परंतु कुठलीही कारवाई झाली नाही. 
 घटनेची माहिती होताच कळमना पोलीस तगड्या बंदोबस्तासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसंनी कसेबसे लोकांना शांत करीत मृतदेह मेयोला रवाना केले. या घटनेमुळे पोलिसांच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे सांगितले जाते की, वाळूने भरलेला टिप्पर ओव्हरलोड होता. तो भरधाव वेगाने जात होता. टिप्पर चालकांना जास्तीत जास्त फेºया करण्यासाठी बक्षिस दिले जाते. यामुळे ते अनियंत्रितपणे वाहने चालवतात. अवैध रेती वाहतूक शहरात नेहमीच चर्चेता विषय राहिला आहे. याला प्रशासन व पोलिसांचेही आश्रय आहे. यात दिग्गन नेतेही सहभागी आहे. त्यामुळे सर्वच आपले डोळे मिटवून घेतात. 
१५ दिवसांपूर्वी वळू माफियाने नंदनवन येथील नायब तहसीलदारावर हल्ला केला होता. याचा सूत्रधार अजुनही पकडला गेला नाही. यापूर्वी सुद्धा वाळू माफियाने पोलीस व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले केलेले आहे. या अपघातात जप्त टिप्परही ओव्हरलोड होता. यानंतरही तो सहजपणे शहरात दाखल झाला. 
 या अपघातामुळे शाहू परिवार प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. रमाशंकर यांचे कुटुंबीय मुळचे अलाहाबाद येथील राहणारे आहेत. त्यांची पत्नी अलाहाबादला गेली आहे. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 

 पोलीस-मेट्रोचा निष्काळजीपणा 
या परिसरातील नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी सांगितले की, पोलीस आणि मेट्रोच्या निष्काळजीपणामुळे येथे नेहमीच अपघात होत असतात. वाहतूक पोलीस केवळ शोभेचे बाहुले बनून उभे असतात. त्यांनी अनेकदा अपघात रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची मागणी केली आहे. परंतु काहीह लक्ष दिले गेले नाही. अपघात झाल्यानंतर दोन-तीन दिवस अधिकारी येऊन पाहतात. त्यानंतर सर्वकाही जैसे थे होते. 

विरोध केल्यावर कारवाई  
 नगरसेविका जयश्री लारोकर यांचे पती योगेश्वर लारोकर यांनी सांगितले की वाहतूक व्यवस्था योग्यपणे सांभाळण्याचा सल्ला देणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलीस कारवाई करतात.  सहा महिन्यांपूर्वी अपघात करून पळून जात असलेल्या एका वाहन चालकाविरुद्ध कारवाई न केल्याबद्दल वाहतूक पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच विरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला होता. सामाकि कार्यकर्ता म्हणून त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की, त्यांना १० दिवस न्यायालयीन तुरुंगात राहावे लागले होते. नागरिक आवाज उचलणार नाही तर असे अपघात होतच राहतील. 


Web Title: In Nagpur, Tipper killed two sisters
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.