नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 22:03 IST2025-08-09T22:02:34+5:302025-08-09T22:03:38+5:30
नागपूरमध्ये कोऱ्हाडी येथे असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे काम सुरू असताना ही घटना घडली.

नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
नागपूरमधील कोऱ्हाडी परिसरात असलेल्या महालक्ष्मी मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला आहे. घटनेमुळे १३ मजूर जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, घटनेनंतर तातडीने एनडीआरएफचे पथकाला बोलावण्यात आले. सध्या शोध व मदत कार्य सुरू आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महालक्ष्मी मंदिराच्या चौथ्या क्रमांकाच्या गेटजवळ प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे. अचानक शनिवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. काम सुरू असताना प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात अनेक मजूर जखमी झाल्याची माहिती असून, 13 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर मदत आणि शोध कार्यासाठी एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले.
नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले की, गेटचे काम सुरू असतानाच ते कोसळले. त्यामुळे जे काम करत असलेले मजूर अडकले होते. ते जखमी झाले आहेत. सगळ्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांच्यावर उपचार सुरू असून, दुर्घटना घडल्यानंतरची प्रक्रिया पाळावी लागते. सध्या मलब्या खाली कुणी नसावं, हीच आशा आम्हाला आहे.'
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'घटनेनंतर गर्दी होऊ नये. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सेंट्रींगखाली आणखी काही मजूर दबून असण्याची शक्यता असल्यामुळे रात्री उशीरापर्यंत शोध कार्य सुरु होते. याबाबत माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, पोलीस उपायुक्त निकेतन कदम, कोराडी पोलिस व एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी पोहूचून त्यांनी बचावकार्य सुरु केले.
घटना घडली कशी?
कोराडी मंदिर देवस्थानात पर्यटन विकासांतर्गत एनएमआरडीएच्या वतीने मंदिराच्या मागील बाजूला हे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ४ कॉलमवर स्लॅब टाकण्यासाठी सेंट्रींग टाकण्यात आली होती. या सेंट्रींगवर शनिवारी स्लॅब टाकण्याचे काम सुरु होते. परंतू रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक ही स्लॅब सेंट्रींगसह कोसळल्याने खाली काम करणारे जवळपास १३ मजूर त्याखाली दबले. त्यांना बचाव पथकाच्या वतीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.