Nagpur: सेवानिवृत्त जवानाचा सख्ख्या मुलावरच गोळीबार, थोडक्यात वाचला जीव, अजनीत खळबळ
By योगेश पांडे | Updated: July 9, 2024 20:50 IST2024-07-09T20:49:45+5:302024-07-09T20:50:02+5:30
Nagpur News: सीआरपीएफच्या सेवानिवृत्त जवानाने क्षणिक संतापातून सख्ख्या मुलावरच गोळीबार केला. यात मुलगा जखमी झाला असून थोडक्यात त्याचा जीव वाचला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

Nagpur: सेवानिवृत्त जवानाचा सख्ख्या मुलावरच गोळीबार, थोडक्यात वाचला जीव, अजनीत खळबळ
- योगेश पांडे
नागपूर - सीआरपीएफच्या सेवानिवृत्त जवानाने क्षणिक संतापातून सख्ख्या मुलावरच गोळीबार केला. यात मुलगा जखमी झाला असून थोडक्यात त्याचा जीव वाचला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
माणिक पुंडलिक इंगळे (६८, ओमसाईनगर) असे आरोपीचे नाव आहे. तर मुलगा नितीन इंगळे (३२) हा जखमी झाला आहे. माणिक सैन्यदलातून सीआरपीएफमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर नागपुरातच वास्तव्याला आहे. त्यानंतर एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. माणिककडे परवाना असलेली बोअर १२ ची रायफल आहे. नितीनला एक मुलगा आहे. मुलाला शिस्त लागावी यासाठी नितीन त्याला रागवायचा व वेळप्रसंगी हातदेखील उचलायचा. यामुळे माणिकराव व नितीनचे वाद होत होते. नितीन सध्या बेरोजगार आहे. माणिकचा नातवावर फारच जीव असल्याने त्याचा शाळेचा खर्च उचलला होता. सोमवारी रात्री कामावरून घरी आल्यावर नातू माणिकजवळ गेला. त्यावेळी नितीनने माणिकला उद्देशून चौकीदार आला असे म्हटले. यावरून माणिक व नितीनमध्ये वाद पेटला. संतापाच्या भरात माणिकने १२ बोअरची रायफल आणली. नितीनने हिंमत असेल तर गोळी चालवूनच दाखव असे म्हटल्याने माणिकच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यातूनच गोळी झाडण्यात आली. गोळी नितीनच्या पायाला लागली. या आवाजामुळे खळबळ उडाली. नितीनच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले व रक्तबंबाळ नितीनला मेडिकल इस्पितळात नेले. पोलिसांनी माणिकविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
क्षणिक वादातून टोकाचे पाऊल
माणिक व नितीन यांच्या अगोदरदेखील वाद झाले होते. दोघेही एकमेकांबाबत वाट्टेल तसे बोलायचे. नितीन लहान मुलाला मारायचा हे माणिकला पटत नव्हते. मात्र कुठलाही वाद इतका विकोपाला गेला नव्हता. सोमवारी माणिक दारूच्या नशेत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्याने मुलावर थेट गोळी चालविताना नातवाचा विचार केला नाही का असा सवाल नातेवाईक व शेजारी उपस्थित करत आहेत. ही गोळी मुलाच्या छातीत लागली असती किंवा त्याची पत्नी व नातवाला लागली असती तर अघटित घडले असते.