नागपूरकरांनो 'या' ब्रॅण्ड्सचे तेल घेऊ नका ! एफडीए तेल विक्रेत्यांवर केली कडक कारवाई; भेसळ आढळल्यास 'या' नंबरवर करा संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 19:50 IST2025-10-10T19:48:13+5:302025-10-10T19:50:31+5:30
इतवारी, मस्कासाथमध्ये धाडी : अन्न व औषध प्रशासन विभागाची मोहीम

Nagpur residents, do not buy oil of 'these' brands! FDA takes strict action against oil sellers; If adulteration is found, contact 'this' number
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी जवळ आली की गोडधोड, तळीव पदार्थ वाढतात अन् त्याचवेळी भेसळखोरही डोके वर काढतात. मात्र यावेळी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने ठरवले आहे, भेसळखोरांना 'सणासुदीची सूट' नाही. विभागाने इतवारी व मस्कासाथ परिसरातील खाद्यतेल विक्रेत्यांवर धडक कारवाई करत तब्बल १० लाखांहून अधिक किमतीचा भेसळयुक्त तेलसाठा जप्त केला.
इतवारीतील राज ऑइल स्टोअर्स येथे जुन्या डब्यांमध्ये तेल रिपॅक करून 'मिलन' या नावाखाली विक्री सुरू होती. ४०० टिन (प्रत्येकी १५ किलो) इतक्या साठ्याचा सुमारे आठ लाखांचा माल जप्त करण्यात आला. याशिवाय नेहरू पुतळा, इतवारी येथील जेठानंद कंपनीवर कारवाई करून 'ओम' ब्रेडचे ८०० टिन रिसायकल केलेले संशयित तेल जप्त केले. तसेच प्रयोगशाळा नसतानाही रिफाइंड सोयाबीन तेल विकणाऱ्या दुकानांवरही धाडी टाकून ८२४ लिटर संशयित तेल (१.२४ लाख रुपये) जप्त केले.
भेसळखोरांना थारा देऊ नका. कोणत्याही दुकानात संशयास्पद तेल, मिठाई किंवा खाद्यपदार्थ आढळल्यास त्वरित तक्रार करा. यासाठी एफडीएच्या टोल फ्री क्रमांक: १८००२२२३६५वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भेसळखोरांनो खबरदार !
भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर एफडीएची मोहीम दिवसरात्र सुरू राहणार आहे. सणासुदीच्या गर्दीत नागरिकांनीही सजग राहावे. कमी किमतीत मिळणारे तेल किंवा मिठाई घेण्यापूर्वी त्यावरील बँड, तारीख आणि परवाना तपासावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
तेल व्यापाऱ्यांत खळबळ
दरम्यान, गोंदियातील शिव ऑइल मिलमध्ये ३ हजार किलो भेसळयुक्त तेल जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. या सर्व कारवाईमुळे शहरातील तेल व्यापाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या काळात तेल, मिठाई, मसाले यांची मागणी वाढते. याचाच फायदा घेऊन काही व्यापारी निकृष्ट दर्जाचे किंवा आरोग्यास घातक पदार्थ विक्रीस ठेवतात. एफडीएने अशा भेसळखोरांवर निखळ कारवाईचा बडगा उगारला असून मोहीम दिवसरात्र सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे.