Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 22:53 IST2025-10-18T22:52:47+5:302025-10-18T22:53:49+5:30
Nagpur Railway: गर्दीच्या आडून समाजविघातक शक्तींनी डाव साधू नये म्हणून मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वे प्रशासनाने खबरदारीच्या अनेक उपाययोजना केल्या आहेत.

Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
नागपूर: रेल्वे स्थानक, गाड्यांमध्ये सध्या प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत आहे. या गर्दीच्या आडून समाजविघातक शक्तींनी डाव साधू नये म्हणून मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वे प्रशासनाने खबरदारीच्या अनेक उपाययोजना केल्या आहेत. मध्य रेल्वेने विभागातील सात रेल्वे स्थानकांना कनेक्ट करणारी 'वॉर रूम' नागपुरात निर्माण केली आहे. दुसरीकडे दपूम रेल्वेच्या सुरक्षा दलाने बॉम्ब शोधक तसेच नाशक पथकासह सशस्त्र जवानांची फाैज तैनात करून रेल्वे स्थानक तसेच गाड्यांची सुरक्षा खांद्यावर घेतली आहे.
दिवाळीचे पर्व सुरू झाले असून सर्वत्र आनंदोत्सवाला उधाण आले आहे. एकीकडे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. दुसरीकडे प्रत्येकाला आपल्या गावात, नातेवाईकांत जाऊन दिवाळी छटपूजा साजरी करायची असल्याने बाहेरगावी राहणारा प्रत्येक जण आपापल्या गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. खास करून दक्षिणेकडून येणाऱ्या गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा नाही. दिल्ली, रायपूर, हावडाकडे तसेच पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांमध्येही प्रचंड गर्दी वाढली आहे.
ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने विविध रेल्वे मार्गावर मोठ्या संख्येत स्पेशल ट्रेन चालविल्या आहेत. तरीदेखिल गर्दी अनियंत्रित होत आहे. या गर्दीच्या आडून समाज विघातक आणि देशविघातक शक्तींनी तोंड वर काढू नये म्हणून सुरक्षेच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावर स्पेशल वॉर रूम तयार करण्यात आली असून, ती नागपूर-मध्य प्रदेशातील सात मोठ्या रेल्वे स्थानकांना कनेक्ट करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे रेल्वे सुरक्षा दलानेही आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.
नागपूर, अजनी, वर्धा, सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह तसेच बैतूल ही सात मोठी रेल्वे स्थानकं या वॉर रूमला कनेक्ट करण्यात आली आहे. वॉर रुममधून २४ तास या सातही रेल्वे स्थानकावरच्या गर्दीवर सूक्ष्म नजर ठेवली जात आहे. कोणत्याही प्रकारची गडबड आढळल्यास अथवा संशय आल्यास तातडीने रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले जात आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे नागपूरचे सिनियर डीसीएम अमन मित्तल यांनी दिली.
अनेक रेल्वे स्थानकं तसेच रेल्वे गाड्यांमध्ये बॉम्ब शोधक तसेच नाशक पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे. सशस्त्र जवान तसेच डॉग स्कॉडचीही नियमित तैनाती करण्यात आली असून सुरक्षेच्या उपाययोजना कडकपणे राबविल्या जात आहेत, असे दपूम रेल्वे नागपूरचे आरपीएफ कमांडंट दीपचंद्र आर्य म्हणाले.