अपघात रोखण्यासाठी पोलिसांचे ‘मिशन जीवनरक्षा’, नागपुरात रिफ्लेक्टर्स असलेले बॅरिकेड्स
By योगेश पांडे | Updated: March 11, 2025 00:01 IST2025-03-11T00:00:10+5:302025-03-11T00:01:11+5:30
नागरिक निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहने चालवितात व त्यातच अनेकांचा बळी जातो असे दिसून आले आहे. यातूनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अपघात रोखण्यासाठी पोलिसांचे ‘मिशन जीवनरक्षा’, नागपुरात रिफ्लेक्टर्स असलेले बॅरिकेड्स
-योगेश पांडे, नागपूर
उपराजधानीतील वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून अपघातांचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे. हीच बाब लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी ‘मिशन जीवनरक्षा’ ही मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी शहरातील १८ ब्लॅकस्पॉट्सचा शोध घेतला असून तेथील अपघात कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. या सर्व ब्लॅकस्पॉट्सवर रिफ्लेक्टर्स असलेले बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
‘मिशन जीवनरक्षा’ या उपक्रमाचा उद्देश रस्त्यावरील प्राणांकित अपघात कमी करणे आणि लोकांच्या जीवाची रक्षा करणे हा आहे. रस्ते आणि अपघात यामध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये दरवर्षी १० टक्के घट करण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने परिपत्रक निर्गमित केलेले आहे.
पोलिसांकडून वाहतुकीविषयी जनजागृती, नो हॉर्निंग मोहिम, शहरातील डार्क झोन दूर करणे, सीसीटीव्ही कार्यप्रणाली अधिक सक्षम करणे, कमांड कंट्रोल सेंटर प्रभावीपणे कार्यान्वित करणे या विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र नागरिक निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहने चालवितात व त्यातच अनेकांचा बळी जातो असे दिसून आले आहे. यातूनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शहरातील १८ ब्लॅकस्पॉट्सच्या ठिकाणी प्रत्येककी ५ बॅरिकेड्स लावून त्यावर स्टिकर आणि रिफ्लेक्टर बसवण्याचे आदेश वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांनी दिले आहेत.
वाहतूक पोलीस निरीक्षकांची बैठक
पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या निर्देशांनुसार माधुरी बाविस्कर यांनी शहरातील १० वाहतूक झोनमधील वाहतूक पोलीस निरीक्षकांची बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये मागील वर्षी झालेल्या प्राणघातक अपघातांची संख्या, चालू वर्षी आतापर्यंत झालेल्या अपघातांची संख्या आणि एकूण अपघातांची आकडेवारी याचा आढावा घेण्यात आला.
हे आहेत अपघाताचे प्रमुख हॉटस्पॉट्स
- खोब्रागडे चौक ते साई मंदिर कटिंग
- मंगळवारी बाजार कटिंग ते तथागत चौक,
- कपिल नगर चौक ते कामगार नगर चौक,
- मारुती शोरूम चौक ऑटोमोटिव चौक,
- प्रधानमंत्री गृहनिर्माण ते पिवळी नदी चौक
- विटाभट्टी चौक ते विनोबा भावे नगर गेट कटिंग
- चिखली चौक
- सर्जा बार भारत नगर कटिंग
- जुना पारडी नाका ते हेमंत सेलिब्रेशन
- कापसी उड्डाणपूल परिसर
- संघर्ष नगर चौक
- छत्रपती चौक
- खामला चौक
- मानकापूर चौक नवीन काटोल नाका चौक
- वाडी टी पॉइंट ते शुभम मंगल कार्यालय