नागपुरात पेट्रोल @ ८०.४९, डिझेल ७०.४४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 20:29 IST2020-06-09T20:24:20+5:302020-06-09T20:29:28+5:30
अनलॉक-१ चा परिणाम आता महागाईवर दिसून येत आहे. राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये सेस तर पेट्रोलियम कंपन्यांनी तीन दिवसात अनुक्रमे १.६९ आणि १.७० रुपयांची वाढ केल्याने ९ जूनला पेट्रोल ८०.४९ व डिझेलची प्रति लिटर ७०.४४ रुपयात विक्री झाली.

नागपुरात पेट्रोल @ ८०.४९, डिझेल ७०.४४
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनलॉक-१ चा परिणाम आता महागाईवर दिसून येत आहे. राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये सेस तर पेट्रोलियम कंपन्यांनी तीन दिवसात अनुक्रमे १.६९ आणि १.७० रुपयांची वाढ केल्याने ९ जूनला पेट्रोल ८०.४९ व डिझेलची प्रति लिटर ७०.४४ रुपयात विक्री झाली. जूनमध्ये पेट्रोल ३.६९ आणि डिझेलमध्ये ३.७० रुपयांची वाढ झाली आहे. दोनदा सेस आणि दरदिवशी दर वाढवून राज्य शासन आणि पेट्रोलियम कंपन्या संकटाच्या काळात ग्राहकांच्या खिशातून पैसे काढत आहे. त्यामुळे ग्राहक संतप्त आहेत.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार पेट्रोलियम कंपन्यांनी १६ मार्चपासून पेट्रोल अणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या होत्या. त्यावेळी पेट्रोल ७५.८० आणि डिझेल ६५.७४ रुपये प्रति लिटर होते. १ एप्रिलला राज्य शासनाने पेट्रोल अणि डिझेलवर १ रुपये सेस वाढविला होता. त्यानंतर पेट्रोल ७६.८० आणि डिझेल ६६.७४ रुपयांवर गेले होते. ३१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवर पुन्हा २ रुपये सेस आकारला. त्यामुळे १ जूनपासून पंपावर पेट्रोल ७८.८० आणि डिझेल ६८.७४ रुपयांवर पोहोचले. आता पेट्रोलियम कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या भावानुसार ६ जूनच्या मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ७ जूनला पेट्रोलमध्ये ५९ पैसे आणि डिझेलमध्ये ५८ पैशांची वाढ होऊन पेट्रोल व डिझेल अनुक्रमे ७९.३९ व डिझेल ६९.३२ रुपयांवर पोहोचले. त्यानंतर ८ जूनला वाढ होऊन पेट्रोल ७९.९७ व डिझेल ६९.८९ रुपयांवर गेले. शिवाय ९ जूनला पेट्रोल ५२ पैसे आणि डिझेल ५५ पैशांनी वधारून पंपावर पेट्रोल प्रति लिटर ८०.४९ रुपये आणि डिझेल ७०.४४ रुपयांवर विक्री झाली.
पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यामुळे महागाई वाढणार आहे. डिझेल महाग झाल्याने मालवाहतुकीचे दर वाढून पुन्हा भाजी, तेल, किराणा, धान्य आणि इतर वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांनीही इंधनावर सेस वाढविला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये बदल दररोज होणार असल्याने इंधनाचे दर उच्चांक गाठतील, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.