नागपूर पेपरफुटी प्रकरण; निवृत्त उपप्राचार्याने केला 'गोपनीयतेचा भंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:00 IST2026-03-16T17:58:52+5:302026-03-16T18:00:16+5:30
Nagpur : सन २०२३ ला कोल्हापूर, लातूर आणि उमरेड येथील तीन वेगवेगळ्या तज्ज्ञ शिक्षकांनी बारावी रसायनशास्त्राचा पेपर सेट केला होता. सेट केलेला हा पेपर मार्च आणि ऑक्टोबर २०२३ या परीक्षेला आला नाही.

Nagpur paper leak case; Retired vice principal 'violated confidentiality'
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : सन २०२३ ला कोल्हापूर, लातूर आणि उमरेड येथील तीन वेगवेगळ्या तज्ज्ञ शिक्षकांनी बारावी रसायनशास्त्राचा पेपर सेट केला होता. सेट केलेला हा पेपर मार्च आणि ऑक्टोबर २०२३ या परीक्षेला आला नाही. मार्च आणि ऑक्टोबर २०२४ च्या दोन्ही परीक्षेतसुद्धा पेपरचे दर्शन झाले नाही. मार्च आणि ऑक्टोबर २०२५ या तिसऱ्या वर्षातही बोर्डाच्या परीक्षेत हा पेपर आला नव्हता. यामुळे आपण सेट केलेला रसायनशास्त्राचा पेपर मार्च २०२६ ला नक्कीच येणार, ही बाब एकदम क्लियर झाली होती. याच संधीचा लाभ पेपरसेटर सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. सतीश मुकुंद खर्चे आणि टार्गेटचा संचालक अतुल जगन चौधरी यांनी संगनमताने घेतला. या संपूर्ण प्रकरणात पेपरसेटर तथा सेवानिवृत्त उपप्राचार्य सतीश खर्च यांनी 'गोपनीयतेचा भंग' केल्याचीही बाब पोलिस तपासात उघडकीस आली आहे.
उमरेड येथील बहुचर्चित पेपरफुटी प्रकरणात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केल्यानंतर आता ते नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. उमरेड पोलिसांनी नुकतेच कोल्हापूर येथील एका पेपरसेटरचे बयाण नोंदविले. या संपूर्ण प्रकरणात अन्य कुणाकडेही शंकेच्या नजरेने बघितल्या गेले नाही, ही बाब आता स्पष्टपणे दिसून येत आहे. उमरेड येथील टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्स कोचिंग क्लासमध्ये ७० ते ७५ बारावीच्या विद्यार्थ्यांची नियमित बेंच होती.
संचालक अतुल चौधरी यांनी आतापर्यंत रसायनशास्त्र या विषयाची तीनवेळा सराव परीक्षासुद्धा घेतली होती. चौथी सराव परीक्षा २५ जानेवारी २०२६ ला झाली. यादरम्यान याच पेपरची तयारी चांगली करा, अशाही सूचना विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी १८ फेब्रुवारीला बोर्डाचा पेपर सोडविला. टार्गेट कोचिंग क्लास आणि बोर्डाच्या पेपरमध्ये काही सूक्ष्म बदल वगळता उर्वरित प्रश्न तंतोतंत निघाले. व्हिडीओ व्हायरल झाला. पेपरफुटीची बातमी फुटली. उमरेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तीन सेट काढले
सन २०२३ ला नाशिक येथे रसायनशास्त्र विषयाचा पेपर काढण्यात आला होता. तीन पेपरसेटरने या विषयाचे तीन सेट काढले. एकूण सात दिवसांच्या मुक्कामादरम्यान आरोपी सतीश खर्चे यांनी गोपनीयतेचा भंग केला.
पोलिसांची दमदार कामगिरी
उमरेडच्या पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडविली होती. नागपूर येथील प्रकरण या प्रकरणापेक्षा वेगळेच होते. अशा बहुचर्चित, क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. योग्य तपासाची दिशा ठरविली आणि या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.