नागपूर महापालिकेने तीन महिन्यात केला ८५ कोटींचा कर वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:54 IST2025-07-01T18:53:30+5:302025-07-01T18:54:38+5:30
मनपाची २५ टक्के उद्दिष्टपूर्ती : सवलतीचा १ लाख ८५ हजार मालमत्ताधारकांनी घेतला लाभ

Nagpur Municipal Corporation collected Rs 85 crore in taxes in three months
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालमत्ता कराचा भरणा साधारणतः वर्षअखेरीस मोठ्या प्रमाणात केला जातो. पण महापालिकेने मालमत्ता करात दिलेल्या सवलतीमुळे पहिल्याच तिमाहीत टार्गेटच्या २५ टक्के करवसुली करण्यात महापालिकेला यश आले आहे. १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत महापालिकेने ८५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाला ३५० कोटींचे टार्गेट देण्यात आले होते.
महापालिकेने नवीन आर्थिक वर्षात ३० जूनपर्यंत मालमत्ता कराचा भरणा केल्यास मालमत्ता धारकांस सवलत दिली होती. यामध्ये ऑनलाइन कराचा भरणा केल्यास १५ टक्के व ऑफलाइन कराचा भरणा केल्यास १० टक्के सवलत देण्यात येत होती. याचा १ लाख ८५ हजार ३७९ मालमत्ता धारकांनी फायदा घेतला. महापालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत मालमत्ता कर आहे.
गेल्या दोन वर्षापासून महापालिका कराची वसुली करण्यासाठी अभय योजना राबवून सवलत उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे विभाग दिलेल्या टार्गेटच्या जवळपास पोहचत आहे. गेल्यावर्षीही १० आणि १५ टक्क्यांची सवलत दिली होती. त्यामुळे गेल्यावर्षी पहिल्या तिमाहीत ५४ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला होता. यंदा ८५ कोटींपर्यंत ही रक्कम पोहचली आहे.
सात कोटींची सवलत
ऑनलाइनमध्ये १५ टक्के व ऑफलाइनमध्ये १० टक्के सवलत देण्यात आली होती. ९१,२८१ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन कर भरून ५ कोटी ३६ लाख ९९ हजार ४६ रुपये सवलत मिळविली. तर ९१,७३९ मालमत्ता धारकांनी १ एप्रिल ते ३० जून दरम्यान महापालिकेच्या कार्यालयात जाऊन मालमत्ता कर भरून १ कोटी ९९ लाख ६३ हजार ४८२ रुपयांची सवलत मिळविली.
अंतिम दिनी सायंकाळी ७ पर्यंत ३ कोटी २२ लाखांची वसुली
- महापालिकेने मालमत्ता कराचा १ भरणा करून सवलतीचा लाभघ्यावा म्हणून शोले सिनेमातील गब्बर सिंगचा आधार घेतला होता. त्याचबरोबर वस्त्यावस्त्यांमध्ये फिरत्या वाहनांच्या माध्यमातून जनजागृती केली होती.
- त्यामुळे अखेरच्या दिवशी मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांचा प्रचंड ओघ दिसून आला. विशेष म्हणजे महापालिकेने इतिहासात पहिल्यांदा ३० जूनला रात्री बारापर्यंत मालमत्ता कराचा स्वीकार करण्यासाठी कार्यालय सुरू ठेवले होते.
- विभागाकडून मिळालेल्या 3 माहितीनुसार, अखेरच्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ३ कोटी २२ लाख रुपये मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला होता.