प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ, कोल्हापूर पोलिस नागपूरकडे, कोणत्याही क्षणी अटक
By दयानंद पाईकराव | Updated: February 26, 2025 21:42 IST2025-02-26T21:42:02+5:302025-02-26T21:42:36+5:30
Nagpur News: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी नागपूरचे प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ, कोल्हापूर पोलिस नागपूरकडे, कोणत्याही क्षणी अटक
- दयानंद पाईकराव
नागपूर - इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी नागपूरचे प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक कोरटकरला अटक करण्यासाठी बुधवारी नागपूरकडे रवाना झाले आहे, परंतु कोरटकर गत दोन दिवसांपासून फरार असून, त्याचा फोनही बंद असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांनी दिली. दरम्यान बुधवारी सकाळी सकल मराठा समाज व शिवप्रेमींनी बेसाच्या सर्व्हर प्रोसेस सोसायटी येथील कोरटकर याच्या घरासमोर आंदोलन करून त्याच्या अटकेची मागणी केली.
छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला मुकबर खानाकडे कुणी पकडून दिले, ही मांडणी सावंत यांनी केली होती. त्यावरून कोरटकर यांनी सोमवारी २३ फेब्रुवारीला रात्री १२ वाजता सलग दोनवेळा फोन करून सावंत यांना धमकावले. सावंत यांनी त्या संभाषणाची क्लिप मंगळवारी सोशल मीडियावर टाकली आणि खळबळ उडाली होती.
या क्लिपमध्ये कोरटकरने, तुम्ही कोल्हापुरात जिथे असाल तिथे लक्षात ठेवा, आमची ताकद कमी लेखू नका. तुम्ही ब्राह्मण मुख्यमंत्री आणि शासनामध्येच आहात, हे विसरू नका. याद राखा अशी ब्राह्मण विरोधी वक्तव्ये करू नका. एक दिवस तुम्हाला आमची औकात दाखवून देऊ. आम्हाला काही बोललात, तर घरात घुसून मारू, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी बुधवारी कोल्हापूर पोलिसांचे पथक कोरटकरला अटक करण्यासाठी नागपूरकडे निघाले. ते रात्री उशिरापर्यंत नागपुरात दाखल होतील, परंतु कोरटकर मागील दोन दिवसांपासून फरार असून त्याचा मोबाइल देखील बंद आहे. त्यामुळे सायबर पोलिस आणि गुन्हे शाखा पोलिस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती बेलतरोडी पोलिसांनी दिली.
शिवप्रेमींचे काळे झेंडे घेऊन आंदोलन
सकल मराठा समाज आणि शिवप्रेमींनी प्रशांत कोरटकर याच्या घरासमोर हातात काळे झेंडे घेऊन बुधवारी सकाळी १०:३० वाजता आंदोलन केले. १५ ते २० आंदोलकांनी नारेबाजी करीत कोरटकरच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर आंदोलनातील अमित जाचक, अशोक अंबरजे, सौरभ रसाळ, प्रदीप घोरपडे, संदीप चव्हाण यांनी झोन ४ च्या उपायुक्त रश्मीता राव, बेलतरोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. कोरटकरच्या घराबाहेर बेलतरोडी ठाण्यातील एक उपनिरीक्षक आणि दोन अंमलदारांची ड्युटी लावण्यात आली आहे.
कोरटकर मागील अदृष्य राजकीय शक्ती ठेचून काढा : मुधोजी राजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मागे अदृष्य शक्ती असल्यामुळे त्याची हिंमत वाढली आहे. छत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नसून, कोरटकरला दिसेल तिथे धडा शिकवा, अशी भूमिका मुधोजी राजे भोसले यांनी बुधवारी सायंकाळी भोसला पॅलेसमध्ये आयोजित सकल मराठा महासंघाच्या बैठकीत घेतली. कोरटकर हा कार घेऊन पळाला, परंतु पोलिस त्याचा शोध घेऊ शकले नसून, पोलिसांची भूमिका तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत गुरुवारी पोलिस आयुक्तांना सकल मराठा महासंघातर्फे निवेदन देण्यात येणार आहे. बैठकीनंतर मुधोजी राजे भोसले यांच्या नेतृत्वात कोतवाली पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.